Dighi Crime News : अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन शेतकऱ्यांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेती उपयोगी ट्रॅक्टर, यंत्रासाठी सरकारकडून अनुदान मिळवून देतो, असे सांगून तहसीलदाराचे नाव सही व शिक्का असलेली खोटी कागदपत्रे दाखविली, तसेच दोन लाख 86 हजार रुपये बँक खात्यामध्ये भरण्यास सांगून दोन शेतकऱ्यांची फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर 2020 ते 3 सप्टेंबर 2021 या कालावधीत भोसरी येथे घडला.

रमेश नथु फुगे (वय 62, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 27) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रवीण बबन जाधव (वय 35, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फुगे तसेच या प्रकरणातील साक्षीदार संतोष पोपट गवारी हे शेतकरी आहेत. त्यांना आरोपीने ‘विघ्नहर फार्मर्स प्रोड्युसर’ या नावाची आपली संस्था असून संस्थेचे मुख्य कार्यालय नारायणगाव, ता. जुन्नर येथे आहे, असे सांगितले. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मालवाहतूक गाडी व शेती उपयोगी ट्रॅक्टर, इतर यंत्रासाठी सरकारकडून अनुदान मिळवून देतो, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले.

दरम्यान, तहसीलदार, जुन्नर यांचे नाव, सही व शिक्का असलेली खोटी बनवलेली सरकारी कागदपत्रे दाखवून व त्या कागदपत्रांची छायांकित प्रत देऊन आरोपीने फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन केला.

फिर्यादीला एक लाख 50 हजार 500 रुपये तसेच संतोष गवारी यांना एक लाख 35 हजार 500 रुपये आरोपी याच्या विघ्नहर फार्मर्स प्रोड्युसर या संस्थेच्या पवना सहकारी बँक, दापोडी शाखा येथील खात्यामध्ये भरण्यास सांगून आरोपीने फिर्यादीची व साक्षीदार संतोष गवारी यांची फसवणूक केली. याप्रकरणी दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.