Pimpri : स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 11 वर

एमपीसी न्यूज – स्वाईन फ्ल्यूने पिंपरी, अजमेरा कॉलनीतील एका 52 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 11 वर गेला आहे.

पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे ‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये डोके वर काढले आहे.  या रोगाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे.  पिंपरी, अजमेरा कॉलनीतील एका 52 वर्षाच्या रुग्णाला उपचारासाठी 24 ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज (सोमवारी) त्यांचा  मृत्यू झाला.

सौम्य ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे स्वाईन फ्लूच्या प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. आजाराच्या पुढील टप्प्यात 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक ताप, तीव्र घसादुखी, घशाला सूज येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिड, झोपाळूपणा अशी लक्षणे दिसून येतात.

सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्ल्यूच्या गोळ्या घ्याव्यात, त्याचबरोबर प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.