Women’s Day : ‘एक स्वप्न, एक तप’! इच्छाशक्तीची अनोखी संघर्षगाथा

एमपीसी न्यूज – महिलांच्या इच्छाशक्तीचा दाखला देणा-या अनेक कथा आपण ऐकल्या असतील. वाचल्याही असतील. एका शिक्षिकेने शिक्षक पदापासून ते  शिक्षण  क्षेत्रातील सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याचे शाळेच्या मैदानावर पाहिलेले स्वप्न एका तपाच्या तपश्चर्येनंतर इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण केले. स्वप्न, मेहनत, सातत्य, आत्मविश्वास आणि श्रद्धा या पंचसुत्रीची सांगड घालत त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरविले. हा संघर्षमय प्रवास आहे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचा…!

दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्योत्स्ना यांचा विवाह झाला. गृहिणी म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांच्या मनामध्ये भरारी घेण्याची ओढ होती. संसारात व्यस्त असतानाही त्यांनी पुढचे शिक्षण घ्यायचे ठरविले. ज्योत्स्ना यांच्या पाठीमागे त्यांचे पती खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी ज्योत्स्ना यांना शिक्षणासाठी प्रोत्साहान दिले आणि त्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रवास सुरु झाला.

अकरावी व बारावीमध्ये त्या कला शाखेतून प्रथम आल्या. त्यानंतर त्यांनी डीएडला प्रवेश घेतला. 1995 साली त्यांनी डीएड पूर्ण केले. त्यानंतर पहिल्याच मुलाखतीमध्ये त्यांना खासगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. शाळेच्या मैदानावर उभं राहून ज्या क्षेत्रात आपण आलो आहोत. त्या क्षेत्रातील उच्चपद मिळवायचे  हे स्वप्न उराशी बाळगले आणि वाटचाल सुरु केली.

_MPC_DIR_MPU_II

संसार, नोकरी आणि संसाराच्या वेलीवर फुललेले फूल अशी तिहेरी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती.  या जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर असतानाही त्यांनी एसवायबीएला प्रवेश घेतला. बीए झाल्या,  बीएडही पूर्ण केले. शिक्षणाची घोडदौड सुरु असताना  कौटुंबिक समस्याही पाठ सोडत नव्हत्या. असे असतानाही त्यांचे ध्येय त्यांना शांत बसू देत नव्हते. सेटची परीक्षा ही दिली आणि उत्तीर्ण झाल्या. फेब्रुवारी 2013 मध्ये त्यांची शिक्षणाधिकारीपदी निवड झाली. शाळेच्या मैदानावर पाहिलेले स्वप्न त्यांनी 12 वर्षाच्या सलग तपश्चर्येनंतर साकार केले.

या प्रवासात अनेक संकटे आली. प्रत्येक संकटाला त्या हिमतीने सामोरे गेल्या. 2018 पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील बदलासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. महापालिकेच्या शाळा सुधारल्या पाहिजे. त्या शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे.  खासगी इंग्रजी शाळांच्या तोडीस शाळा तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

या प्रवासाबाबत सांगताना ज्योत्स्ना शिंदे म्हणातात, ”या प्रवासात अनेक संकटे, अडचणी आल्या. पण, जिद्द न हरता प्रत्येक प्रसंगाला हिमतीने सामोरे गेले. गुरु आणि पुस्तकांनी मला घडविले. स्त्री म्हणून खूप प्रश्नांना सोमोरे जावे लागले. स्त्री कितीही पुढे गेली. तरी, संघर्ष तिच्या पाचवीला पुजलेला असतो. संघर्षातून जी पुढे जाते. तीच यशस्वी होते. संघर्ष, संकटे परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात त्यात पास होणे ही देखील परीक्षा असते. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात असले. तरी, एखादे स्वप्न समोर ठेवावे आणि त्यादृष्टीने वाटचाल करावी. स्वप्नाला इच्छाशक्ती आणि मेहनतीचे पाठबळ असेल तर ते स्वप्न सत्यात उतरते. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे. सामाजिक परिस्थिती बदलली आहे. स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्त्रीने स्वत:ला सक्षम बनवावे. शारिरीक, मानसिकदृष्या स्त्रीने कनखर असले पाहिजे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.