Kasarsai Dam : धरणात पाय घसरून पडल्याने एकाचा बुडून मृत्यू, आठवड्याभरात पुणे जिल्ह्यातील तिसरी घटना

एमपीसी न्यूज –   कासारसाई धरणात पाय घसरून पडल्याने एका मुलाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. प्रदुम गायकवाड ( वय – 14, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे मुलाचे नाव आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग रेस्क्यू पथक यांनी पुढाकार घेत शोधमोहिम राबवली आणि साधारण दुपारी तीनच्या सुमारास या मुलाचा मृतदेहच त्यांच्या हाती लागला.

धरणात बुडून मृत्यू होण्याची पुणे जिल्ह्यातील ही तिसरी घटना असून या आधी भाटघर धरण परिसरात फिरण्यास गेलेल्या पाच तरूणींचा एकमेकींना वाचवताना दुर्दैवी मृत्यू झाला, तर चासकमान धरणात पोहण्यासाठी गेलेले चार विद्यार्थी सुद्धा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना घडली आहे आणि आज कासारसाई धरणात बुडाल्याची दुर्घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदुम त्याच्या कुटुंबियांसोबत कासारसाई धरण परिसरात फिरण्यास आला होता. दरम्यान पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने तो पाण्यात उतरला, मात्र पाण्यात पाय घसरून पडल्याने प्रवाहात तो ओढला गेला आणि पाण्यात बुडाला. ही घटना सकाळी 10 च्या सुमारास घडली.

अल्पवयीन मुलगा पाण्यात बुडाल्याचे कळताच शिवदुर्ग मित्रचे पथक आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था घटनास्थळी दुपारी 1.30 वाजता दाखल झाले, त्यांनी शोधमोहिम सुरू केली आणि अनेक प्रयत्नांनंतर दुपारी 3 च्या सुमारास मृतदेह शोधण्यास पथकाला यश आले.

स्थानिक नागरिक राजाराम केदारी, शिवदुर्गचे गणेश ढोरे, प्रवीण देशमुख, अजय शेलार, भास्कर माळी, हर्षल चौधरी, रुपेश गराडे यांच्या चमुने तात्काळ पुढाकार घेत शोधकार्य केले आणि प्रदुमचा मृतदेह त्यांनी बाहेर आणला. दरम्यान, याप्रकरणी शिरगा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बी सी गावीत तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.