Nashik News : आधारची जोडणी अभावी एक लाख लाभार्थी रेशनला मुकणार 

एमपीसी न्यूज : जिल्ह्यातील तब्बल एक लाख लाभार्थ्यांनी अद्याप रेशनकार्डला आधार नंबर लिंक न केल्याने त्यांना चालू महिन्याचे अन्नधान्यापासून वंचित रहावे लागले आहे. आधार नोंदणी केल्यानंतरच अन्नधान्य दिले जाईल असे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, रेशन दुकानावर जाऊन लाभार्थ्यांनी आधार नंबर लिंक केल्यास त्यांचे अन्नधान्य वाटप केले जाईल.

रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी  बोगस रेशनकार्ड धारकांची शोध मोहीम यंत्रणेकडून सुरु आहे. त्याच बरोबर  रेशनकार्डला आधारची जोडणी न केलेल्या तब्बल १ लाख नागरिकांचे धान्यच चालू महिन्यांपासून बंद झाले आहे. रेशनमधील काळाबाजार बंद करण्यासह वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाच्या वतीने बायोमेट्रीक प्रणाली विकसित करण्यात आली. त्यात ऑनलाईनच धान्याचे वितरणाची व्यवस्थाही झाली. यामध्ये प्रत्येक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्यांना दरमहा आवश्यक असलेले धान्य शासनास कळविणे आवश्यक आहे.

हे ऑनलाईन असल्याने किती धान्याची उचल आणि वितरण झाले हे देखील या एईपीडीएस प्रणालीद्वारे दिसून येते. शिवाय कुठल्या तालुक्याला किती धान्य हवे, त्यांना किती दिले, त्यांनी दुकानदारांना किती वितरीत केले याचीही माहीती ऑनलाईनच दिसते. शिवाय दुकानदारांकडे किती कार्डधारक आहे. त्यानुसार किती धान्याची मागणी आहे, किती दिले अन् किती दुकानदारांनी संबधित कार्ड धारकांना वितरीत केले. त्यांच्याकडे किती धान्य शिल्लक आहे. याची संपूर्ण माहीतीच ऑनलाईन दिसते.

आता त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक कार्डावरील व्यक्तीचे आधार लिंक करण्याची प्रक्रीया सुरु आहे. फेब्रुवारीपर्यंत त्याची मुदत होती. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास १ लाखावर नागरिकांची आधार लिंक झाले नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना मार्च महिन्यातील धान्य दिले जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.