Pimpri News: संतापजनक! पालिकेच्या कोविड सेंटरमधील ‘मोफत बेड’साठी रुग्णाकडून उकळले तब्बल एक लाख रुपये!

मुख्याध्यापिकेच्या निधनानंतर खासगी संस्थांचा धंदा  उघडकीस, प्रकरण दडपण्यासाठी राजकीय नेत्यांचा आटापिटा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टरमध्ये चालविण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये आयसीयू बेडसाठी एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून तब्बल एक लाख रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

सुमारे पाच कोटी रुपयांची कथित बोगस बिले सादर करून महापालिकेला लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या स्पर्श या खासगी संस्थेच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाही लुबडण्याचा धंदा सुरू आहे. दोन नगरसेवकांनी या प्रकरणाचे बिंग फोडल्यानंतर महापालिकेतील सत्तारूढ भाजपच्या तीन नेत्यांनी ‘मांडवली’चा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे.

महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आयसीयूची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगत ‘एक लाख रुपये द्या आम्ही बेड मिळवून देतो’, असे सुचविले. एक लाख रुपये घेऊन त्यांना महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेतले.

ही सुविधा मोफत असताना एक लाख रुपये घेतल्यामुळे हे कोविड सेंटरचे संचलन करणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलचे बिंग फुटले. स्पर्श हॉस्पिटलच्या सल्लागाराने 80 हजार रुपये तर खासगी हॉस्पिटलचालकाने 20 हजार रुपये घेतल्याचा आरोप संबंधित नगरसेवकांनी केला आहे. शहरात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड नसल्याचे सांगितले जाते. पण, महापालिका खर्च करत असलेल्या ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून पैसे घेऊन बेड दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू आहे. स्पर्श ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार सुविधा असतानाही रुग्णांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या खासगी संस्थांवर आता महापालिका आयुक्त राजेश पाटील काय कारवाई करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

काय आहे हे प्रकरण?  

_MPC_DIR_MPU_II

चिखली येथील महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. उपचार सुरू असताना हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रुग्ण मुख्याध्यापिकेची प्रकृती खालावल्याने त्यांना अति दक्षता विभागात अर्थात ‘आयसीयू’मध्ये हलवावे लागेल, असे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. ‘आम्ही तुम्हाला आयसीयू बेड मिळवून देतो, हॉस्पिटलचे नाव सांगत नाहीत. फक्त एक लाख रुपये भरावे लागतील’ असे सांगितले. नातेवाईकांनी एक लाख रुपये दिले.

एक लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांना महापालिकेच्या ऑटो क्लस्टरमधील मोफत उपचारांची सुविधा असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना मुख्याध्यापिकेचे बुधवारी (दि.28) दुर्दैवाने निधन झाले.

महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी मुख्याध्यापिकेच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेतल्याची माहिती चिखलीतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक विकास डोळस यांच्यासह गुरुवारी ऑटो क्लस्टर गाठले. गायकवाड आणि डोळस यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याबद्दल जाब विचारला.

संबंधित खासगी हॉस्पिटलने पैसे घेतले असतील असे सांगून कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलने हात झटकले. त्यानंतर या नगरसेवकांनी त्यांचा मोर्चा संबंधित खासगी हॉस्पिटलकडे वळविला. तेथील डॉक्टरला जाब विचारला. डॉक्टरला चोपही दिला. त्यावर या डॉक्टरने ‘स्पर्श’च्या सल्लागाराचे नाव घेतले. त्याने 80 हजार रुपये घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर हा सगळा गैरप्रकार उघडकीस आला.

गुरुवारी दिवसभर या प्रकरणाची चर्चा सुरू होती. हे प्रकरण रफादफा करण्यासाठी सत्ताधारी भाजपचेच काही नेते रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. शहरवासीयांनी ज्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी सोपविली आहे, त्यांनीच अशा चुकीच्या प्रकारला साथ देणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

दरम्यान, यापूर्वी रुग्णांवर उपचार न करता स्पर्शने महापालिकेला पाच कोटी रुपयांची खोटी बिले सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

या संदर्भात स्पर्श संस्थेच्या संचालक डॉ. अमोल होळकुंदे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत त्यांनी बोलणे टाळत महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हस जगताप यांच्याशी संपर्क करण्यास सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.