Pune : अमेरिकेतून परतलेल्या एकाला कोरोनाची बाधा; पुण्यात बाधितांची संख्या 10

एमपीसी न्यूज – अमेरिका येथून भारतात (पुण्यात) आलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बांधितांची संख्या 10 झाली आहे. तर राज्यात हा आकडा 17 वर पोहोचला आहे. मात्र, योग्य ती खबरदारी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबत माहिती दिली. पुणे शहरात कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्या रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर योग्य उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. नवीन आढळलेल्या रुग्णासह अन्य बाधित आणि निरीक्षणात असलेल्या सर्व जणांची प्रकृती स्थिर आहे.

पुण्यामध्ये आजवर तीन हजार 440 जणांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. तर परदेशातून आलेल्या 700 प्रवाशांचा सध्या पाठपुरावा सुरु आहे. आजपर्यंत 233 जणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील 224 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 10 जणांचा अहवाल कोरोनाबाबत सकारात्मक आला आहे. नऊ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे विभागातील कोल्हापूर येथे परदेशातून आलेल्या 44, सांगली येथे सहा, सातारा येथे नऊ आणि सोलापूर येथे सात जणांवर देखील प्रशासनाचे लक्ष आहे. त्यांना त्यांच्या घरात वेगळ्या खोलीत राहावे, घरच्यांशी देखील कमी संपर्क करावा, वैद्यकीय विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्या प्रवाशांचा प्रशासनाकडून योग्य तो पाठपुरावा केला जात आहे.

विलगीकरण कक्षात ठेवलेले काहीजण माध्यमांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ती त्यांची नैसर्गिक प्रक्रिया आहे. कारण, माणूस हा समाजशील प्राणी असून समाजापासून तो वेगळा राहू शकत नाही. निरीक्षणासाठी ज्यांना ज्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे, त्यांना एकाकी वाटणे साहजिक आहे. मात्र, प्रशासन त्याबाबत सकारात्मक पावले उचलत आहे. माध्यमांनी वस्तुस्थिती जाणून न घेता बातम्या देऊ नयेत. सांगोपांगी अथवा अफवा पसरविणा-या बातम्या दिल्यास योग्य कारवाई केली जाईल, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले.

संबंधित आणखी बातम्या वाचा –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.