Maval : राष्ट्रवादीचे सुनील शेळके विक्रमी मताधिक्याने विजयी; भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दारुण पराभव

एमपीसी न्यूज – जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती आणि गोरगरिबांसाठी उदार अंतःकरणाने गेली पाच वर्षे स्वकमाईतून राबविलेले मदतीचे उपक्रम, मुख्यमंत्र्यांनी तिकीट वाटपात केलेला अन्याय आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली संधी, याच्या जोरावर राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी मावळ विधानसभेच्या निवडणुकीत मावळ मतदार संघातून विक्रमी मताधिक्याने विजयीश्री खेचून आणली.

गेली 25 वर्षे भाजपाचा अभेद्य राहिलेला मावळ गढ राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या सुनील शंकरराव शेळके यांनी एकतर्फी सर केला. त्यांनी 93 हजार 612 मतांची आघाडी घेत भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा दारुण पराभव केला.

सुनील शेळके यांना एकूण एक लाख 67 हजार 141 मते मिळाली. प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार बाळा भेगडे यांना केवळ 73 हजार 529 मते मिळाली.

मावळ विधानसभा मतदारसंघात यावेळी 3 लाख 48 हजार 462 मतदार होते. त्यापैकी दोन लाख 47 हजार 961 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. इतर पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

कमालीची उत्सुकता लागलेल्या मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या या विजयाने तालुक्यातील राजकीय परिवर्तनाचे संकेत स्पष्ट केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सत्येंद्रराजे दाभाडे(सरकार), याज्ञसेनीराजे दाभाडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, माजी खासदार विदुरा नवले आदिंनी सुनील शेळके यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजता तळेगाव दाभाडे येथे मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीत 1997 मतांची आघाडी घेतलेल्या सुनील शेळके यांनी ती कायम राखत शेवटच्या 27 व्या फेरीअखेर एकतर्फी 93 हजार 612 मताधिक्य घेत विजय प्राप्त केला.

“नम्र पणे विजय स्वीकारतो. याविजयाचे श्रेय मी मावळच्या जनतेला देतो. ही निवडणूक माझी नसून सर्वसामान्य जनतेच्या अस्मितेची होती. लाखो मतदारांनी पक्ष, गटतट न पाहाता काम करणा-याला मतदान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट वाटपात सच्या कार्यकर्त्यावर अन्याय केला. त्यांना मावळच्या जनतेने जनाधाराची ताकद दाखवून दिली आहे. भाजपातले खरे निष्ठावंत देखिल माझ्या पाठीशी उभे होते. मात्र प्रामाणिकपणे केलेले कार्य, लोकहिताची कामे आणि मोठा जनाधार याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार साहेब, अजितदादा पवार, कॉंग्रेस, मनसे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीतील नेते यांनी घेत माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचा आज खऱ्या अर्थाने विजय झाला आहे. मावळात काही गावात अतिवृष्टी झाली. तेथील शेतक-यांच्या भेटीला आपण प्रथम जाणार आहोत.”
सुनील शंकरराव शेळके, नवनिर्वाचित आमदार, मावळ विधानसभा मतदारसंघ.

उमेदवार, पक्ष, मिळालेली मते याप्रमाणे:-

सुनील शेळके- राष्ट्रवादी कॉंग्रेस- 1लाख 67हजार 141
संजय(बाळा) भेगडे- भाजपा- 73हजार 529
मंदाकिनी भोसले- बसप- 891
रमेश ओव्हाळ – वंचित- 2722
खंडूजी तिकोणे- अपक्ष- 469
धरमपाल तंतरपाळे- 500
मुकेश अगरवाल- 664
नोटा- 1485

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.