Chakan Murder : पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून एकावर कोयत्याने वार करत खून; चाकणमध्ये तीन दिवसांत 2 हत्या

राजेंद्र मेदनकरवाडी येथे सिद्धिविनायक नगर नंबर दोनमधील भाले यांच्या गाळ्याजवळ आले असता आरोपींनी त्यांच्या डोक्यात, पाठीवर कोयत्याने सपासप वार केले.

एमपीसी न्यूज- तक्रार केल्याने पोलिसांनी अटक केल्याचा याचा राग मनात धरून तिघांनी मिळून तक्रार देणाऱ्या व्यक्तीचा कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी (दि.26) रात्री सव्वासात वाजता मेदनकरवाडी येथे घडली.

राजेंद्र जालिंदर काळे (वय 36, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र यांची पत्नी सोनाली राजेंद्र काळे (वय 31, रा. मेदनकरवाडी, पुणे. मूळ रा. सारोळा, ता. जामखेड, अहमदनगर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सत्यम दत्तात्रय कड (रा. कडाचीवाडी, ता. खेड) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2018 मध्ये मृत राजेंद्र यांनी आरोपींच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपींनी राजेंद्र यांच्या खुनाचा कट रचला.

रविवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास राजेंद्र मेदनकरवाडी येथे सिद्धिविनायक नगर नंबर दोनमधील भाले यांच्या गाळ्याजवळ आले असता आरोपींनी त्यांच्या डोक्यात, पाठीवर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र यांचा यातच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी पलायन केले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विशाल लांडगे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.