Chakan : काळूस येथील जाचकवस्तीवर एकाची आत्महत्या ; कारण अस्पष्ट

एमपीसी न्यूज – विषारी औषध प्राशन करून पन्नास वर्षीय इसमाने अगदी टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाकण जवळील काळूस (ता. खेड) येथील जाचकवस्ती वरील एका शेतात सोमवारी (दि. २२ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. मात्र, संबंधित इसमाच्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजले नसल्याने येथील पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. 
मारुती बाबुराव धाडगे ( वय- ५० वर्षे, मूळ रा. दावडी, ता. खेड, जि.पुणे), असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. काळूस गावचे पोलीस पाटील संदीप किसन पवळे (वय – ४१ वर्षे, रा. काळूसची पवळेवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती धाडगे हे मुळचे दावडी (ता. खेड) येथील राहणारे रहिवाशी आहेत. धाडगे यांनी सोमवारी (दि.२२ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान चाकण जवळील काळूस गावच्या हद्दीतील जाचक वस्तीवरील बबन विठ्ठल जाचक यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजले नसल्याने येथील पोलिसांनी गु.र.नं. २३१/२०१८ नुसार, सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मित मयत अशी नोंद केली आहे.
चाकण ग्रामीण रुग्णालयात धाडगे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून शवविच्छेदन होताच त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रात्री उशिरा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.