Pune : पुणेकरांवर येणार दिवाळी नंतर पाणीकपातीची संक्रांत

एकवेळ होणार पाणीकपात

एमपीसी न्यूज – शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठीचे वेळापत्रक महापालिका प्रशासनाने तयार केले असून, त्याची अंमलबजावणी पाणी कपातीनंतर करण्यात येणार आहे. कोणत्या भागात किती पाणीपुरवठा होतो, त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पेठांमधील पाण्याच्या वापरावर निर्बंध येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दिवाळीनंतरच पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा राजकीय निर्णय झाल्याने तूर्त तरी पुणेकरांना कपातीला सामोरे जावा लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे पडसाद पुणे महापालिकेच्या सभागृहात देखील पाहायला मिळाले. शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरले. पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सभागृह चालू नका असा सूर भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी लगावला तर मध्य पुण्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने नागरिक फक्त शिव्या द्यायचे बाकी असा संताप सुद्धा धीरज घाटे यांनी व्यक्त केला. यावर सगळ्यावर खुलासा करताना प्रशासनाने स्पष्ट केले की, कालवा फुटीनंतर पुणे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला हे मान्य आहे. काँटोंमेंटला कॅनॉल मधून पाणी सोडताना गळती होत असल्याने जास्त पाणी सोडावे लागत आहे. नोव्हेंबर शेवट पर्यंत पर्वती ते काँटोंमेंट पाईपलाईनचे काम पूर्ण होणार असला तरी येत्या 2 दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करू. तर पुण्याची पाणी कपात अजून झाली नसून दिवाळीनंतर एक वेळ पाणी कपात करण्यात येणार असल्याचे देखील प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाने पाणीकपात केल्यानंतर शहराच्या पूर्व भागाला पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. पुणेकरांना कुठलीही पूर्वकल्पना न देता पाणी कपात झाल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला होता. प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या आडमुठेपणाचा फटका सहन केल्यानंतर प्राथमिक तयारी म्हणून पाणी कपातीचे वेळापत्रक तयार केले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव वेळापत्रक पुणेकरांसमोर लवकरच मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पालिकेत नुकतेच गटनेत्यांच्या बैठकीत या वेळापत्रकाबाबत चर्चाही झाली होती. या वेळी आयुक्तांनी वेळापत्रक पुणेकरांसमोर कपातीपूर्वीच ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.