Kothrud News : मद्यप्राशन करून बुलेट चालवणे जीवावर बेतले, एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्युज : मद्यप्राशन करून चुकीच्या दिशेने भरधाव वेगात दुचाकी चालवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. ही दुचाकी समोरून येणाऱ्या चारचाकी कारवर आदळून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. कोथरूड परिसरातील पौड रस्त्यावर 29 नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला. 

शिवम राजेंद्र पवार (वय 21, पूर्वा अपार्टमेंट, कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे तर शैलेश घाग हा त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला होता. शिवम पवार याने मद्यप्राशन करून तो मित्र शैलेश सह जेवण करण्यासाठी निघाला होता. रॉयल इन्फिल्ड दुचाकीने चुकीच्या दिशेने आणि भरधाव वेगात जात असताना त्याची गाडी समोरून येणाऱ्या चार चाकी गाडी वर जाऊन आदळली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही कोथरूड परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु शिवम पवार याचा मृत्यू झाला.

दरम्यान सुरुवातीला कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी तपासादरम्यान रुग्णालयातील कागदपत्र तपासले असता शिवम मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोथरुड पोलीस अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.