Nigdi : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दुसरीचा विनयभंग करून दोघींचे अपहरण

पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – एका अल्पवयीन मुलीला अंधारात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित मुलीच्या मावस बहिणीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर दोन्ही मुलींचे अपहरण केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 15) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास निगडी परिसरात घडला. याबाबत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

करण भैरवनाथ साबळे (वय 21), आशिष आनंद सरोदे (वय 20), निवास संजय सुतार (वय 20), तेजस राजू वाघमारे (वय 19), कार्तिक उर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (वय 21, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष याने मंगळवारी रात्री फिर्यादी अल्पवयीन मुलीला अंधारात नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान तिथे पीडित मुलीची मावस बहीण आली असता आरोपी करण याने तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला.

त्यानंतर आरोपी करण आणि आशिष या दोघांनी अन्य आरोपी निवास, तेजस आणि कार्तिक या तिघांना बोलावून घेतले. सर्व आरोपींनी मिळून दोन्ही मुलींना लाल रंगाच्या अल्टो कारमध्ये जबरदस्तीने बसवून चिंचवड स्टेशन येथे नेले. याबाबत पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीनुसार आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 376, 354 (ब), 34, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 2012 चे कलम 3, 4, 7, 8, 11, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.