Chakan : कांद्याच्या दरात उसळी; ९,५०० रुपये क्विंटलला भाव

चाकण मार्केटमधील स्थिती

एमपीसी न्यूज – कांद्याच्या दराने चाकणमध्ये घाऊक बाजारात मोठी उसळी घेतली असून कांद्याला तब्बल ९ हजार ५०० रुपये एवढा प्रतीक्विंटलला भाव मिळाला.  किरकोळ बाजारात देखील कांद्याने दराचा उच्चांक गाठला आहे. चांगल्या प्रतीचा जुना कांदा चाकणला किरकोळ बाजारात १०० ते  १२५ रुपये किलो पर्यंत विक्री झाल्याचे आडत्यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात जुना कांदा चक्क सव्वाशे रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. मात्र, अत्यंत हलक्या दर्जाचा कांदा खरेदीकडे नागरिकांनी मोर्चा वळविला आहे. अत्यंत सुमार दर्जाचा, हलक्या प्रतीचा काहीसा खराब झालेला कांदा २० ते २५ रुपये किलोने विक्री होत आहे. सर्वसामान्य ग्राहकही हाच कांदा खरेदी करीत असल्याचे चित्र चाकण मार्केटमध्ये पहावयास मिळत आहे.

यंदाच्या पावसाने कांदा पिकाची दाणादाण झाली आहे. परतीचा पाऊस उशिरापर्यंत बरसत राहिल्याने लागवड क्षेत्र घटले. त्याच प्रमाणे लागवड देखील चार ते सहा आठवडे विलंबाने झाली.  महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आदी कांदा उत्पादक प्रमुख राज्यांमधे पावसाळा लांबल्यामुळे कांद्याच्या उभ्या पिकाचे नुकसान झाल्याचे खुद्द केंद्र शासनाने देखील स्पष्ट केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात देशातील कांदा उत्पादन २६ टक्के म्हणजे ५२ लाख टनाने घसरले आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्यामुळे दबाव येत असल्याचे केंद्र शासनाने लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, यंदा उत्पादनावर परिणाम झाला असून सप्टेंबर ऑक्टोबरमधे पडलेल्या पावसामुळे कांद्यांचे सर्वात मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे.

दरवेळी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात येणारा कांदा यंदा जानेवारीच्या मध्यानंतर बाजारात येण्याची शक्यता असल्याने तूर्तास आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. शनिवारी चाकण मार्केटमध्ये १ हजार २५० क्विंटल कांद्याची आवक होऊन ९ हजार ५०० रुपये एवढा प्रतीक्विंटलला कमाल भाव मिळाला असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. बाजारात नवीन कांदा येईपर्यंत कांद्याचे भाव असेच चढे राहणार असल्याचे बाजार समितीचे सचिव राम गोरे व आडते असोसिएशनचे अध्यक्ष जमीर काझी यांनी सांगितले.

अवकाळी पावसाने बदलले चित्र :
खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत नोव्हेंबर अखेर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन दर पडत असल्याने शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येत होती. यंदाच्या वर्षी मात्र अवकाळी पावसाने सारे चित्रच बदलून टाकले आहे.

हलक्या प्रतीच्या कांद्याला उठाव :

पावसाने नुकसान झाल्याने नवीन कांद्याची प्रतवारी घसरली आहे. अत्यंत हलक्या प्रतीचा कांदा देखील बाजारात येत आहे. हा कांदा तुलनेने स्वस्त असल्याने आणि २० ते ३० रुपयांत खरेदी करता येत असल्याने अनेक नागरिक हॉटेल व्यावसायिक असाच कांदा खरेदी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.