Chakan : चाकणला 125 गाड्या कांद्याची आवक; कांद्याचे दर गडगडले; 1500 ते 1700 रुपये क्विंटल

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये बुधवारी (दि.४) कांद्याची मोठी आवक झाली. आवक स्थिर राहूनही कांद्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत गडगडले आहेत. कांद्याची सुमारे १२५ गाड्यांची आवक होऊन कमालभाव २ हजार १०० रूपये क्विंटल वरून १ हजार ७०० रुपयांवर घसरला आहे. दरम्यान, कांद्याला सरासरी १२ ते १५ रुपये एवढा प्रति किलोला दर मिळाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. 

चाकण येथील बाजारात बुधवारी कांद्याची एकूण आवक १२५ ट्रक कांद्याची आवक झाली.  गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक घसरली असून निर्यात बंदी उठवण्याच्या शासनाच्या घोषणे नंतरही प्रत्यक्षात निर्यात सुरूच झालेली नसल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरु आहे.  मागील शनिवारी कांद्याचा कमाल भाव २ हजार १०० रुपयांवर स्थिरावला होता. बुधवारी कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे भाव किमान स्थिर राहतील अशी अपेक्षा होती.

प्रत्यक्षात कांद्याला १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपये एवढाच प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे. यंदा उशिरा लागवड झालेली असल्याने पुढील काळात आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अशा स्थितीत कांद्याच्या दरात घसरण सुरु झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने निर्यातीबाबत तत्काळ ठोस भूमिका घेण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.