एमपीसी न्यूज – घराघरातून ऐकू येणारे झांजा, टाळ, ढोलकाचे आवाज, टीपेच्या आवाजात म्हटले जाणारे अभंग, आरत्या, मंत्रपुष्पांजली, मोरया मोरयाचा जयघोष, एकमेकांकडे दर्शनाला जाण्यासाठी ठेवणीच्या ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये नटले, सजलेले भाविक बघितले की लगेच समजते, गणपतीबाप्पांचे शुभ आगमन झालेले आहे. एकंदरीनेच चातुर्मास सुरु झाला की सण, समारंभांची नुसती रेलचेलच असते. त्यात भाद्रपद महिन्यात येणारे गणपतीबाप्पा तर सगळ्यांचे विशेष लाडके.

गणरायाचे स्वागत करण्यासाठी सगळ्या घरादाराची नुसती धावपळ उडालेली असते. मखर सजवण्याचे काम तरुणाईचे, पूजेचे काम ज्येष्ठांचे, नैवेद्याची बाजू सांभाळणार घरातील महिलावर्ग अशी कामांची विभागणी देखील झालेली असते. यंदादेखील मोठ्या उत्साहात गणपतीबाप्पांचे स्वागत झालेले आहे.

मात्र या करोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रथा, परंपरा नक्कीच बदलल्या आहेत. यंदा लोकांना आपापल्या गावी जाणे जमलेले नाही. त्यासाठी ज्यांना इ-पास काढता आला नाही. त्यांनी आपल्या घरीच थांबणे पसंत केले आहे. तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते देखील फारसे घराबाहेर पडत नसल्याने ऑनलाईनच घरच्या गणपतीचे दर्शन घेत आहेत. कारण मनातील श्रद्धा मात्र स्वस्थ बसू देत नाही. वर्षातून एकदाच येणारा हा उत्सव कोणत्याही प्रकारे चुकू नये हीच मनातली भावना  आहे. मग या आधुनिक युगात यंदा प्रत्येकजण तंत्रज्ञानाची मदत घेताना दिसत आहे.

त्यामुळे बदलत्या काळात यंदा आरत्या ‘ऑनलाईन’ म्हटल्या जात आहेत. परंपरेनुसार साधारणपणे घरातील मोठ्या भावाच्या घरी गणपतीची स्थापना केली जाते. त्याच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी मग इतर नातेवाईक त्यांच्या घरी येतात. काही लोकांकडे दीड दिवसाचा गणपती असतो. तर काही जणांकडे गणपती आणि गौरींचे एकत्र विसर्जन केले जाते. तर काही ठिकाणी दहा दिवस गणराय विराजमान असतात. यंदा आपल्या मूळ घरी ज्यांना जाणे शक्य झालेले नाही, ते एकमेकांना व्हिडिओ कॉल करुन ऑनलाईन आरती म्हणत आहेत.

आरतीची वेळ झाली की कॉल केला जातो, त्यावर इतर सगळे नातेवाईक कनेक्ट होतात.  प्रत्येकजण मनापासून आपापल्या घरीच आरत्या म्हणतो. एवढेच नाही तर ज्यांच्याकडे अथर्वशीर्षाचे पठण केले जाते, ज्याला आवर्तने करणे असे म्हणतात. तेदेखील ऑनलाईन केले जात आहे. तंत्रज्ञानाचा असा सकारात्मक उपयोग करुन बाप्पांचे दर्शन घेतले जात आहे.

आपण गणरायाला बुद्धीची देवता मानतो. या एकविसाव्या सुपरफास्ट शतकात विज्ञान आणि भक्तीची ही सुंदर सांगड करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ठिकठिकाणी घातलेली दिसून येत आहे.