Nigdi : ऑनलाइन व्यवसायासाठी ग्राहकही ऑनलाइन मिळविण्याची गरज – चेतना पवार

उद्योजकता स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप कार्यशाळा

एमपीसी न्यूज- सध्याचे युग इंटरनेटचे असल्याने ऑनलाइन राहण्याला कधी नव्हे ते अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसाय करणे फायद्याचे ठरणार आहे. ऑनलाइन व्यवसायासाठी ग्राहकही ऑनलाइन मिळविण्याची गरज आहे, अशी माहिती व्यवसायतज्ञ चेतना पवार यांनी निगडी येथे दिली.

उद्योजकता स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत निगडी येथील अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्यावतीने ऑनलाईन व्यवसायाबाबतीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आयोजक अमित गोरखे उपस्थित होते. अमित गोरखे यांच्या हस्ते चेतना पवार यांचा सत्कार करण्यात आला.

त्या पुढे म्हणाल्या,”पारंपरिक उद्योगाची नाळ अजूनही टिकविणा-यांसमोर हल्लीच्या स्मार्ट आणि वेगवान ‘ई-कॉमर्स’ उद्योगाने मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे पारंपरिक उद्योग तोट्यात जात असल्याचे बाजारातील चित्र आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी बऱ्याच जणांनी आपला उद्योग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्याचा ‘स्मार्ट’ निर्णय घेतला आहे. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या वेबसाइटच्या मदतीने बऱ्याच जणांनी आपल्या पारंपरिक उद्योगाला ऑनलाइनची जोड दिली आहे. काही छोट्या उद्योगांनीही ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा अवलंब केलेला दिसून येतो.

ऑनलाइनची आवश्यकता काय? याबाबतीत त्या म्हणाल्या, पारंपरिक व्यवसाय करणारा सहजासहजी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर येण्यास तयार होत नाही. या माध्यमातून नसत्या उठाठेवी का करा, ही त्यामागील भावना असते. या दरम्यान, सध्याच्या इंटरनेटच्या आणि स्पर्धेच्या जगात टिकून राहायचे असेल, तर ऑनलाइनशिवाय पर्याय नसल्याचे त्यांच्या गावीही नसते. वाढती स्पर्धा, विस्तारणारे आणि जवळ येणारे जग पाहता सद्य परिस्थितीत ऑनलाइनशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते.

वेबसाइट का बनवावी?

– हल्ली कोणतीही सेवा असो की उत्पादन लोक सर्वप्रथम त्याविषयीची माहिती ऑनलाइन माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत संबंधित उत्पादनाची अथवा सेवेची इत्थंभूत माहिती देणारी वेबसाइट अथवा पोर्टल असणे अधिक महत्त्वाचे आहे.

– ऑनलाइन माध्यमातून आपली सेवा अथवा वस्तू दाखवली जाऊ शकते अथवा तिचे मार्केटिंग केले जाऊ शकते. – तुमच्या व्यवसायाचे ठिकाण दर्शविण्यासाठी ही सर्वांत उपयुक्त आणि चांगली पद्धती आहे. – जर तुम्हाला कोणत्याही उत्पादनाची विक्री करायची असेल, तर कमी खर्चांत सर्वत्र पोहोचण्यासाठी वेबसाइटची मदत होऊ शकते. मात्र, ई-कॉमर्स वेबसाइट बनवणे आणि तिचा मेंटेनन्स करणे या अतिशय खर्चिक बाबी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही लहान उद्योजक असाल, तर आधीपासूनच उपलब्ध असणाऱ्या ‘ई-कॉमर्स’ वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही उत्पादनांची विक्री करू शकता. किंवा स्वतःच्या वेबसाइटवर विक्री करू शकता.

वेबसाइट तयार करण्याचा खर्च

– एक वेबसाइट तयार करण्यासाठी 5 ते 15 हजारापर्यंत पर्यंत खर्च येतो. यामध्ये होस्टिंगचा खर्च (1500 ते 4000) डोमेन खरेदीचा खर्च (वार्षिक 500 ते 1500) डिझाइन आणि लेआउटचा खर्च (दर्जाप्रमाणे) आदींचा समावेश असतो. – जर तुम्हाला वस्तू अथवा सेवांच्या विक्रीसाठी वेबसाइटची आवश्यकता असेल, तर अशा वेबसाइटच्या निर्मितीसाठी फारसा खर्च येत नाही. अशा वेबसाइट तयार करण्यासाठी अतिकुशल तंत्रज्ञांची आवश्यकताही नसते. अतिशय कमी खर्चात ही वेबसाइट तयार होऊ शकते. जर तुम्हाला अतिशय आकर्षक आणि दर्जेदार वेबसाइट तयार करायची असेल, तर खर्च 1,00,000 ते पाच लाखांच्या दरम्यान येऊ शकतो. अशा वेबसाइटमध्ये उत्पादनांचा समावेश करायचा असतो. एकदा उत्पादनांचा समावेश केल्यानंतर जगभरातील ग्राहक खरेदीसाठी तेथे येणार असतात. त्यामुळे हा ताण सहन करण्यासाठी मोठी वेब होस्टिंग सेवा आणि जास्त स्पेसची आवश्यकता असते. अशा वेबसाइटवर लोकांकडून खरेदी-विक्री आणि पेमेंट होत असल्याने त्यांच्या मेंटेनन्सची आवश्यकता भासते. अशा प्रकारच्या वेबसाइट 24 तास चालविण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यासाठी कर्मचारी भरती करणे भाग पडते. ई-कॉमर्स वेबसाइटवर ट्रॅफिकच्या हिशेबानुसार सातत्याने फेरबदल करण्याची आवश्यकता भासते. त्यासाठी एका चांगल्या इंजिनीअरची गरज भासते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचे स्वागत अमित गोरखे यांनी केले.आभार रवी घाटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.