Hinjawadi News : आयटी नगरीत ऑनलाईन चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

महाराष्ट्र, आसाम, बिहार मधील चार तरुणींची सुटका

एमपीसी न्यूज – आयटी नगरी असलेल्या हिंजवडीमध्ये ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये महाराष्ट्र, आसाम आणि बिहार येथील चार तरुणींची सुटका करण्यात आली असून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

जीवन संतोष ताथवडे (वय 23, रा. चिंचवडेनगर, चिंचवड. मूळ रा. पिंपळवाडी, ता. खेड), रामदास सोपानराव साळुंखे (वय 62, रा. येरवडा, पुणे), अनिकेत चंद्रकांत भालेराव (वय 26, रा. शिंदेवस्ती रोड, गणेशनगर, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह केशव, राहुल, दीपक उर्फ बॉबी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात ऑनलाईन माध्यमातून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांचा शोध, आर्थिक देवाण घेवाण केली जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता ऑनलाईन वेबसाईट आणि मोबाईल क्रमांक आढळले. ऑनलाईन माध्यमातून बनावट गिऱ्हाईकामार्फत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला.

त्यात पोलिसांनी महाराष्ट्र, आसाम आणि बिहार राज्यातील चार तरुणींची सुटका केली. सुटका केलेल्या तरुणींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींनी त्यांचे मोबाईल क्रमांक वेबसाईट मध्ये दिले होते. ग्राहकांनी वेबसाईटवरून नंबर घेऊन आरोपींशी संपर्क केल्यास ग्राहकांच्या मोबाईल फोनवर फोटो पाठवले जात. ग्राहकांना पसंत पडलेल्या मुलींना ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी पाठवून दिले जात. यासाठी आठ हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते.

अटक केलेल्या तीन आरोपींकडून रिक्षा, दोन मोबाईल फोन असा एकूण 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात भूमकर वस्ती येथील आदिती एक्झिक्युटिव्ह ओयो या हॉटेलचा वेश्या व्यवसायासाठी वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहिता 370, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.