Pimpri : अर्थसंकल्पासाठी आठ प्रभागातून केवळ 21 जणांनीच सुचविली कामे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2020-2021 या आर्थिक वर्षांसाठी नागरिकांना दहा लाखापर्यंतची कामे सुचविण्याच्या केलेल्या आवाहनाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. आठ प्रभागातून केवळ 21 जणांनीच अर्थसंकल्पासाठी कामे सुचविली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ‘फ’  प्रभागातून 14, ‘ड’ मधून 4 आणि ‘अ’ मधून 3 कामे सुचविली आहेत. तर,  ‘ब’, ‘क’, ‘ग’, ‘इ’, ‘ह’ या पाच प्रभागातून एकही काम सुचिवण्यात आले नाही.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेच्या वतीने 2007-08 या आर्थिक वर्षापासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव केला जात आहे. त्यानुसार, अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. शहरातील विविध विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावीत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि विकासकामांवर लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा, यादृष्टीने नागरिकांकडून अर्थसंकल्पासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम महापालिकेकडून राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपापल्या परिसरातील एखादे काम अर्थसंकल्पात सूचवता येते. त्यासाठी सुचविलेल्या कामाचा खर्च दहा लाख रुपयापर्यंत असावा एवढीच एकमेव अट महापालिकेने घातली आहे. कचरा पेटीची व्यवस्था, पदपथ तयार करणे, रस्त्यांचे डांबरीकरण, दिवे लावणे, सिग्नल बसविणे, बसस्थानक उभारणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, वृद्धांसाठी बैठक व्यवस्था करणे, बागा किंवा उद्यानातील सुधारणा आदी कामांबाबत नागरिक सूचना करु शकतात. योग्य सूचनांचा समावेश महापालिकेच्या अर्थसंकल्पात केला जातो.

यंदा देखील महापालिकेने नागरिकांना 25 नोव्हेंबर 2019 पर्यंत कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. आठ प्रभागातून केवळ 21 जणांनीच अर्थसंकल्पासाठी कामे सुचविली आहेत. या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक ‘फ’  प्रभागातून 14 कामे सुचविली असून त्यात 13 स्थापत्य विषयक, एक दुरुस्तीचे काम सुचविले आहे.  ‘ड’ मधून 4 आणि ‘अ’ मधून 3 कामे सुचविली आहेत. तर,  ‘ब’, ‘क’, ‘ग’, ‘इ’, ‘ह’ या पाच प्रभागातून एकही काम सुचिवण्यात आले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.