Pavana Dam News : पाणी जपून वापरा! पवना धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा

गतवर्षीपेक्षा 6 टक्के कमी पाणी; जूनअखेरपर्यंत पुरेल पाणी

एमपीसी न्यूज – यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने पवना धरणांमधील पाण्याची मागणी वाढली आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. आजमितीला धरणात 30.75 टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 6 टक्क्यांनी कमी आहे. हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल. परंतु, पावसाने ओढ दिल्यास पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून केले जात आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. सध्या धरणातून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काही दिवसांत धरणांमधील पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली जाण्याची शक्यता आहे. पवना धरणातील पाण्याचा वापर शेतीसह मावळ आणि पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना पिण्यासाठी होतो.

पवना धरणात आजमितीला 30.75 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजअखेर 36.65 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात 6 टक्के पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच धरण 100 टक्के भरले होते. परंतु वाढते तापमान व पाण्याची वाढती मागणी या बाबींचा विचार करता पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.

पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे म्हणाले, ”धरणात आजमितीला 30.75 टक्के पाणीसाठा आहे. जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 36.65 टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा 6 टक्के पाणीसाठा कमी आहे. उष्णतेची लाट, पाण्याचा वापर वाढल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास अडचण होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.