Pimpri News : केवळ 13 दिवसांसाठी स्थायी समितीत नवीन 8 सदस्यांची निवड होणार, विद्यमान अध्यक्षांनाच मुदतवाढीची शक्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक वेळेत होऊ शकली नसल्याने केवळ 13 दिवसांसाठी आर्थिक बाबींबाबतचे निर्णय घेणा-या स्थायी समितीत नवीन 8 सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 18 फेब्रुवारी 2022 रोजी होणा-या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर कोणी नाराज होऊ नये यासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून विद्यमान सदस्यांना आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांनाच 13 दिवसांसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे केवळ 13 दिवसांसाठी स्थायी समितीत नवीन 8 सदस्यांची निवड करावी लागणार आहे. अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. स्थायी समितीतील भाजपच्या शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे या सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर या दोन अशा 8 सदस्यांचा स्थायी सदस्यत्वाचा दोन वर्षाचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे.

त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांची फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत निवड केली जाणार आहे. नव्याने नियुक्त होणा-या सदस्यांना केवळ 13 दिवसांचा कालावाधी मिळतो. त्यात 5, 6, 12 आणि 13 मार्चला शनिवार, रविवार अशा चार सुट्य्या येत आहेत. त्यामुळे कामाकाजाचे केवळ 9 दिवस मिळणार आहेत. त्यातही अध्यक्ष निवडीसाठी तीन ते चार दिवस जातील. त्यामुळे प्रत्यक्ष कामाकाजाचे पाचच दिवस असा अल्प कालावधी मिळणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर केवळ 13 दिवसांसाठी कोणी नाराज होऊ नये याकरिता भाजप आणि राष्ट्रवादीकडून विद्यमान सदस्यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांचा कालावधी संपत नसल्याने पाच ते सहा दिवसांसाठी नवीन अध्यक्ष निवडण्याऐवजी भाजपकडून त्यांनाच संधी दिली जाईल असे भाजपमध्ये चर्चा आहे. तर, स्थायी समितीचे विद्यमान सदस्य भाजपचे नितीन लांडगे, सुजाता पालांडे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भालेकर, राजू बनसोडे शिवसेनेच्या मीनल यादव आणि अपक्ष आघाडीच्या नीता पाडाळे यांना 13 दिवसांचा वाढीव कालावधी मिळणार आहे.

अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ”नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी 13 मार्च 2022 पर्यंत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागली असती तर स्थायी समितीत नवीन सदस्यांची निवड करण्याची आवश्यकता नव्हती. पण, आचारसंहिता लागली नाही. त्यामुळे स्थायी समितीत 13 दिवसांसाठी नवीन 8 सदस्यांची फेब्रुवारीच्या सभेत निवड केली जाणार आहे. त्यानंतर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविली जाईल”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.