BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : काँग्रेस-राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्यावरच विरोधी पक्षनेतेपद मिळेल – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीत लढायचे कोणाशी हे समजत नाही, समोर पहिलवानच दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदरच आपला पराभव मान्य केला आहे. 15 वर्ष ते सत्तेत येणार नाहीत. हे माहित असल्यानेच त्यांनी जाहिरनाम्यात भरमसाठ आश्वासने दिली आहेत. केवळ ताजमहल बांधून देण्याचे आश्वासन शिल्लक राहिले असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीच्या जाहीरनाम्यावर केली. तसेच त्यांचा विरोधी पक्षनेता देखील होणार नाही. दोन्ही काँग्रेसचे विलिनीकरण केल्यानंतरच विरोधी पक्षनेता होईल, असेही ते म्हणाले.

रहाटणीतील कापसे लॉन्स येथे आज (गुरुवारी) चिंचवडमधील भाजप-शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी मावळचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे, पिंपरीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, अमित गोरखे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, हेमंत तापकीर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजाजन चिंचवडे, उमा खापरे, राजेश पिल्ले, बाबू नायर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

15 वर्ष सत्ता असतानाही अजित पवार यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविले नाहीत. त्यांनी शास्तीकर लादला असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, भाजपची सत्ता येताच शास्तीकराच्या जाचातून नागरिकांना मुक्त केले. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू केले. शहरात स्मार्ट सिटी, मेट्रोचे काम सुरू आहे. त्याच्या माध्यमातून कन्क्टेव्हिटी वाढणार आहे. पीएमपीएमएलच्या एसी बस सुरू झाल्या आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी उर्जेवर चालणार्‍या बस घेण्यात येणार आहेत. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भामा आसखेडच्या पाणी आरक्षणाला मुदतवाढ दिली. त्याचे पाईपलाईन टाकणे, टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे.

पवना बंद जलवाहिनीचा प्रश्न चर्चेतून मार्गी लावला जाईल. शेतकर्‍यांशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. परंतू, आचारसंहिता लागली. भविष्यात हा प्रश्न मार्ग लावून 50 वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. शहरातील सांडपाण्यामुळे नद्या प्रदूषित  झाल्या आहेत. 3 ते 4 वर्षांत एक थेंबही सांडपाणी प्रक्रियेविना नदीत जाणार नाही. एमआयडीसीने महापालिकेच्या हद्दीतील सांडपाणी प्रक्रिय करून उद्योगाकरिता वापराचे आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like