Pune News : लोकसंख्येच्या तुलनेत शहरात फक्त एक टक्का कोरोना चाचण्या : विशाल तांबे

वाढत्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव बघता लोकसंख्येच्या प्रमाणात टेस्टिंग संख्या वाढवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आजमितीस शहराच्या लोकसंख्येचा विचार केला तर फक्त ६ हजार टेस्ट दररोज केल्या जातात, शहराची लोकसंख्या ही जवळपास चाळीस लाख आहे. त्याचबरोबर शहरातील विद्यार्थी, कामगार आणि शहराच्या नजिकच्या भागांमधून व गावांमधून ये-जा करणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला तर, फक्त एक टक्के कोरोना चाचण्या केल्या जात असल्याचे वास्तव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी शुक्रवारी आयुक्तांना दिलेल्या पत्रात मांडले.

पुणे शहरामध्ये वाढत्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव बघता लोकसंख्येच्या प्रमाणात टेस्टिंग संख्या वाढवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पुणे महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांची चाचणी करण्यास सुरुवात केली.

गेले सात महिने आरटीपीसीआर टेस्ट आणि रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिका आजमितीस पंधरा क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत व नायडू हॉस्पिटल यांनी मिळून 19 ठिकाणी आरटीपीसीआर टेस्ट करत आहे. पंधरा क्षेत्रीय कार्यालयासह नायडू हॉस्पिटल यांचे मिळून 21  ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट करत आहे.आज रोजी शहरात सहा ते सात हजार टेस्ट दररोज केल्या जातात.

मागील काही दिवसांमध्ये वाढणारा संसर्गाचा प्रादुर्भाव बघता रोजच्या होणाऱ्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात या दोन्ही टेस्टचे प्रमाण ठरवणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर ज्या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळत आहे त्या ठिकाणी ताबडतोब टेस्टिंगची संख्यादेखील वाढवणे गरजेचे असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.

आजमितीस शहराच्या लोकसंख्येचा विचार केला तर फक्त 6 हजार टेस्ट दररोज केल्या जातात शहराची लोकसंख्या ही जवळपास चाळीस लाख आहे. त्याचबरोबर शहरातील विद्यार्थी, कामगार आणि शहराच्या नजिकच्या भागांमधून नजीकच्या गावांमधून ये-जा करणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला तर आजमितीस आपण फक्त 1 टक्के चाचण्या फक्त करीत आहोत.

गणेशोत्सवानंतर रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दैनंदिन व्यवहार ज्या पद्धतीने सुरू आहेत, या सर्व बाबींचा विचार करता टेस्टिंगची संख्या वाढवणे हीच महापालिकेची प्राथमिकता असली पाहिजे. ज्यामुळे शहरातील कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये मदत होईल आणि नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी यश मिळेल.

म्हणून पुणे महापालिकेने लोकसंख्येच्या प्रमाणात टेस्टिंगच्या संख्येचे प्रमाण ठरवणे हे क्रमप्राप्त आहे, असेही विशाल तांबे यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.