Pimpri News: …तरच खऱ्या अर्थाने सकारात्मक सामाजिक क्रांती साधता येईल

एमपीसी न्यूज – समाज सुधारकांनी सामाजिक क्रांतीची ज्योत लावली. त्यांच्या त्यागातून आपल्याला ‘भारतीय संविधान’ मिळाले असून सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय बहाल झाले. या संविधानाचे मर्म समजून घ्यायचे असेल तर महापुरुष आणि संतांनी त्याग आणि समर्पित भावनेने केलेले कार्य समजून घेऊन त्यांच्या विचारांचा कृतिशील वारसा जपला तरच खऱ्या अर्थाने सकारात्मक सामाजिक क्रांती साधता येईल, असा विश्वास ‘सामाजिक क्रांती – एक प्रवास’ या विषयावरील परिसंवादातून व्यक्त करण्यात आला.

संविधान दिवसाचे औचित्य साधून संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘सामाजिक क्रांती – एक प्रवास’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. यामध्ये अॅड. संभाजीराव मोहिते, प्रा. विनोद इंगळे, प्रा. अशोक भाटकर सहभागी झाले होते. त्यावेळी आपले मत व्यक्त करताना ते बोलत होते.

प्रा. अशोक भाटकर म्हणाले, साम, दाम, दंड आणि भेद ही समाज तोडण्याची नीती आहे. यामुळे समाजाचे अधःपतन होते. त्यामुळे सामाजिक क्रांतीला खिळ बसते. तर स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवतेच्या विकासाची मुल्ये आहेत. या माध्यमातून समाज जोडण्याचे काम होते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. न्यायासाठी त्याग करून झगडले पाहिजे. सामाजिक क्रांती करायची असेल तर अन्न, वस्र, निवारा, आरोग्य, शिक्षण तसेच रोजगार या मुलभूत गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे. सामाजिक क्रांतीमध्ये शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका आहे. म्हणूनच संतानी आणि महापुरुषांनी शिक्षणासाठी चळवळ उभी केली. सामाजिक क्रांतीचे समीक्षण करून देशातील सर्वच घटकांनी संघटीत होऊन काम केल्यास सामाजिक क्रांती होईल, असे मत भाटकर यांनी व्यक्त केले.

Measles : पाच वर्षांखालील मुलांवर विशेष लक्ष द्यावे; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचना

अॅड. संभाजीराव मोहिते म्हणाले, ‘भारतीय संविधान’ हे सर्वात दुर्लक्षित पुस्तक ठरले आहे. ही मोठी शोकांतिका आहे. भारतीय संविधान हे प्रत्येक घरात पोहोचणे ही काळाची गरज बनली आहे. या संविधानाचा प्रत्येकाने अंगीकार करणे गरजेचे आहे. सामाजिक क्रांती साधायची असेल तर महापुरुषांचे स्मरण होणे आवश्यक आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी तसेच समाजातील जातीयता कमी करण्यासाठी प्रेरणादायी कार्य केले. समता, बंधुता ही फक्त बोलण्यापुरतीच मर्यादित न राहता जगण्याचा भाग बनून आपल्या कृतीत येणे महत्त्वाचे आहे. नियमांमध्ये पळवाटा खूप असतात परंतु या पळवाटांचा उपयोग समाजहितासाठी समाजाच्या आनंदासाठी झाला तर काहीतरी परिवर्तन होईल. शिक्षणाचा कृतीशील वारसा जपून त्याची सुरुवात स्वतःपासून सुरुवात केली तर सामाजिक क्रांती होण्यास वेळ लागणार नाही, असे मत मोहिते यांनी मांडले.

प्रा. विनोद इंगळे म्हणाले, सामाजिक क्रांती साधायची असेल तर महापुरुषांनी ‘सामाजिक क्रांतीसाठी केलेला प्रवास’ समजून घेणे गरजेचे आहे. सामाजिक क्रांतीची सुरुवात महात्मा जोतीराव फुले यांनी केली. त्यांचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून पूर्ण केले. परंतु, आजही या संविधानाची अंमलबजावणीप्रभावीपणे होताना दिसत नाही. अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी महात्मा जोतीरावांनी आणि सावित्रीबाईनी त्याग आणि समर्पित भावनेने केलेले अविरत कार्य समजून घेणे आवश्यक आहे. चार मुले आणि पत्नीला गमावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान आपल्याला दिले. या त्यागातून मिळालेल्या संविधानाचे मूल्य समजून घेणे गरजेचे आहे. सामाजिक आस्था असेल तर सामाजिक क्रांती साधता येते. फुले व आंबेडकर यांची गुरु शिष्याची जोडी आजही प्रेरणादायी आहे. आपल्या गुरूंचे विचार अंगीकारत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारा खरा शिष्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. महापुरुष आणि संतांनी कधीच जातीच्या पलीकडे जाऊन काम केले. परंतु, समाजाने त्यांना जातिच्या चौकटीत बंदिस्त केले, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.