Pimpri: नळजोड नियमितीकरणासाठी केवळ दोन हजार अर्ज; 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात 14 हजार 447 नळजोड अनधिकृत असले तरी  केवळ दोन हजार 298 लोकांनी नियमित करण्यासाठी पाच महिन्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ एक हजार 627 जणांचे अर्ज पाणीपुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. दरम्यान, नळजोड नियमित करण्यासासाठी अर्ज करण्यास 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून त्यानंतर फौजदारी कारवाई करणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्याभरापासून विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले आहेत. त्यामुळे पाण्याची गळती होती. तसेच दुषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण सुरु केले होते. अनधिकृत नळजोड धारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. यादरम्यान केवळ 2 हजार 298 नागरिकांनी नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक हजार 627 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

नव्याने निर्माण झालेल्या थेरगाव परिसरातील ‘ह’ प्रभागात सर्वाधिक म्हणजेच पाच हजार 767 अनधिकृत नळ नळजोड आहेत. तर, निगडी, प्राधिकरणाचा परिसर असलेल्या ‘अ’ प्रभागात सर्वाधिक कमी 209 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी नियमीत करण्यासाठी 21 जणांनी अर्ज केले असून संपूर्ण अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ‘ब’ प्रभागाच्या हद्दीत 2 हजार आठ नळजोड अनधिकृत असून त्यापैकी 577 नागरिकांनी नियमित  करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील 497 अर्ज मंजूर झाले आहेत.

‘क’ प्रभागाच्या हद्दीत दोन हजार 185 अनधिकृत नळजोड असून नियमित  करण्यासाठी केवळ 161 जणांनी अर्ज केले आहेत. त्यातील 60 अर्ज मंजूर झाले. ‘ड’ प्रभागाच्या हद्दीत 486 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी 158 जणांनी नियमितीसाठी अर्ज केले होते. त्यातील 132 मंजूर झाले आहेत. ‘ई’ प्रभागात 967 अनधिकृत नळजोड असून 73 जणांनी अधिकृतसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 25 जणांचे अर्ज मंजूर केले आहेत. ‘फ’ प्रभागात एक हजार 722 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी नियमित करण्यासाठी 924 जणांनी अर्ज केले आहेत. त्यातील 731 मंजूर झाले आहेत.

‘ग’ प्रभागाच्या हद्दीत एक हजार 103 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी 279 नागरिकांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील 119 अर्ज मंजूर झाले आहेत. तर, ‘ह’ प्रभागात सर्वाधिक पाच हजार 767 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी केवळ 105 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील 42 अर्ज  मंजूर करण्यात आले आहेत.

शहरात एकूण 14 हजार 447 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी केवळ दोन हजार 298 नागरिकांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले असून त्यातील एक हजार 627 मंजूर करण्यात आले आहेत. नागरिकांचा नळजोड नियमित करण्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेने 31 ऑक्टोबरपर्यंत नळजोड नियमित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. तथापि, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता 15 नोव्हेंबरपर्यंत नळजोड नियमित करण्यास मुदतवाढ देण्याचा आदेश महापौर राहुल जाधव यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘नळजोड नियमित करण्यास 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. आजपर्यंत लिखित आदेश प्राप्त झाला नाही. तथापि, त्याची अंमलबजावणी केली जाईल.  आम्ही कारवाई करु अशी लोकांना खात्री वाटत नाही.  त्यामुळे नळजोड नियमित करण्यास नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी 15 नोव्हेंबरपर्यंत नळजोड नियमित करुन घ्यावेत. ही अंतिम मुदवाढ असणार आहे. त्यानंतर अनधिकृत नळजोड आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे. नळजोड नियमित करण्यासाठी पैसे एकदम भरावे लागत आहेत. त्याचे टप्पे करावेत, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली आहे. नागरिकांनी तत्काळ नियमित करण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.