Lonavla News : लसीचे दोन्ही डोस घेतले नसल्यास लोणावळ्यात ‘नो एन्ट्री’

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोणावळा प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. आता कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच लोणावळ्यात प्रवेश मिळणार आहे. नागरिकांची तपासणी करण्यासाठी शहरातील प्रवेशद्वारांवर तपासणी नाके लावण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली आहे.

खंडाळ येथील शारदा हॉटेल, वळवण गावातील सेंटर पाँईट येथे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तपासणी नाके लावण्यात येणार आहेत. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यानाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. तर मुदत संपल्यावर देखील दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना तपासणी नाक्यावरच लस दिली जाणार आहे. याशिवाय नागरिकांची अॅन्टीजेन चाचणी देखील केली जाणार आहे.

मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मावळात कोरोना लसीचा पहिला डोस 120 टक्के नागरिकांनी घेतला म्हणजेच मावळातील नागरिकांसह तालुक्‍याबाहेरील नागरिकांनी देखील मावळात लसीचा पहिला डोस घेतला मात्र तब्बल 44 हजार नागरिकांनी मुदत संपल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. नागरिकांचे हे वागणे त्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने लोणावळा शहरासह कामशेत, वडगाव, तळेगाव या शहरांच्या प्रवेशद्वारांवर देखील तपासणी नाके लावण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.