International Women’s Day : या स्टेशन वर स्टेशन मास्तर पासून पॉइंटमन पर्यंत फक्त महिला राज

एमपीसी न्यूज : आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस. आज महिला फक्त पुरुष जमातीची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्रात पाय रोवून उभ्या असलेल्या दिसतात. रेल्वे हे असेच एक क्षेत्र. पण येथेही महिला पुरुषांच्या मागे नाहीत. भारतात आज अनेक रेल्वे स्टेशन्स वर महिला राज असून स्टेशन मास्तर पासून पॉइंटमन पर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिला समर्थपणे सांभाळत आहेत.

या यादीत मुंबईचे उपनगर असेलेले माटुंगा रेल्वेस्टेशन विशेष महत्वाचे आहे कारण 2018 मध्ये हे स्टेशन महिला संचालित स्टेशन म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदले गेले आहे. 2017 पासून 41 महिलांचा चमू या स्टेशनची जबाबदारी अतिशय उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. नागपूरचे अजनी रेल्वे स्टेशन हे सॅटेलाइट रेल्वे स्टेशन मध्य रेल्वे विभागात येते. या स्टेशनची जबाबदारी महिला वर्गाच्या हाती असून येथून रोज 6 हजार प्रवासी प्रवास करतात. या स्टेशन वरील 22 महिला कर्मचारी ही जबाबदारी खंबीरपणे सांभाळत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

जयपूर मधील गांधीनगर रेल्वेस्टेशन उत्तर पश्चिम रेल्वे विभागात येते. हे महत्वाचे स्टेशन असून येथून रोज 50 रेल्वे जातात त्यातील 25 या स्टेशन वर थांबतात. येथून रोज सरासरी 7 हजार प्रवासी प्रवास करतात. स्टेशन मास्तर पासून पॉइंट मन पर्यंत सर्व कामे 32 महिला कर्मचारी करतात. या भागात अनेक कॉलेजेस आणि शिकवणी वर्ग असल्याने येथे महिला आणि विद्यार्थी वर्गाची अधिक गर्दी असते.

गुजराथचे मणीनगर रेल्वे स्टेशन असेच महिलंच्या अखत्यारीत असलेले राज्यातील पाहिले रेल्वे स्टेशन आहे. पश्चिम रेल्वे विभागातील या स्टेशनवर स्टेशन मास्टर पासून रेल्वे सुरक्षा बलातील 10 महिलांसह 36 कर्मचारी आहेत. आंध्रप्रदेशातील चितूर जिल्ह्यातील चंद्रागिरी स्टेशन राज्यातील पाहिले महिला संचालित स्टेशन असून येथे 12 महिला कर्मचारी सर्व जबाबदारी पार पाडतात. याशिवाय तिरुपती, फिरंगीपुरम आणि हैद्राबाद बेगमपेठ रेल्वेस्टेशन सुद्धा महिला सांभाळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.