Moshi : आंतरराष्ट्रीय केंद्राच्या जागी आता खुले प्रदर्शन केंद्र

प्राधिकरणाच्या सभेत निर्णय 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्याच्याऐवजी आता खुले प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रदर्शन केंद्राच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला. 

प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राऐवजी खुले केंद्र उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात पेठ क्रमांक सहामध्ये 18 एकर जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्या जागेसह इतर चौदा भूखंड विविध कार्यक्रमांना तसेच प्रदर्शनासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, त्यासाठी चार किलोमीटरची सीमाभिंत बांधण्यात आली. ती जागा प्रदर्शन व इतर कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास प्राधिकरण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी दुस-या टप्प्यातील 98 हजार चौरस मीटर जागेवरील प्रदर्शन केंद्रासाठीच्या 66 कोटी रुपयांच्या खर्चालाही सभेत मंजुरी देण्यात आली. या ठिकाणी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे.

औद्योगिक कंपन्यांसाठी पूरक असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला होता. त्यासाठी स्वतंत्र कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल- एसपीव्ही) देखील स्थापन केली जाणार होती. त्या कंपनीमार्फत हे प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार होते. अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त अशा प्रदर्शन केंद्राचे संकल्प चित्र तयार करण्यासाठी एसजीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी प्राधिकरणाने कंपनीला काही रक्कमही अदा केली होती. त्यानंतर राज्य शासनाने प्रदर्शन केंद्राचा खर्च प्राधिकरणाने करावा असे सांगितले. तेव्हापासून प्रदर्शन केंद्राच्या निर्मितीचे काम थंडावले होते.

…हे केले आहेत बदल!

पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राऐवजी पुणे खुले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र संबोधणार, दोनशे एकरवर असणारे केंद्र शंभर एकरवरच उभारणार, सातऐवजी तीन बंदिस्त हॉलमध्ये प्रदर्शन केंद्र, गोल्फ फोर्स, रिटेल मॉल गुंडाळणार, खुले प्रदर्शन केंद्र हे 98 हजार चौरस मीटर करणार, 35 हजार चौरस फुटांचे व्यावसायिक केंद्र आणि संग्रहालय, पाच हजार आसन क्षमतेचे कन्व्हेंशन सेंटर उभारणार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या मूळ संकल्पनेत कोणताही बदल होणार नाही. केवळ टप्प्याटप्प्याने गरजेनुसार प्रदर्शन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. तीन टप्प्यांत आणि सुमारे पाच वर्षांचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात 11 हेक्‍टर जागेच्या सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दुस-या टप्प्यातील सिमाभिंत बांधणे, वृक्षारोपण, ब्लॉक टाकणे आदी कामासाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार असून त्याला प्राधिकरणाच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.