Pune Crime News : तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते उघडून अश्लील मजकूर पोस्ट
एमपीसी न्यूज : एका 25 वर्षीय तरुणीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून त्यावरून तिचा मोबाईल क्रमांक आणि अश्लील मजकूर पोस्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकारनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आयटीआय नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी धनकवडी परिसरात राहते. अज्ञात आरोपीने तिच्या नावाने इंस्टाग्राम बनावट अकाऊंट तयार केले. त्यानंतर त्या ठिकाणी अश्लील मजकूर पोस्ट करून तरुणीचा मोबाईल नंबरही टाकला होता. त्यानंतर या मोबाईल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून फोन येऊ लागले. अनोळखी व्यक्ती तिच्याशी अश्लील भाषेत बोलत होते. त्यामुळे ही तरुण घाबरली होती.
या सर्व प्रकारा विषयी तिने अधिक चौकशी केली असता तिला इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.