Pimpri : ज्या विषयाचा अभ्यास करताना तुम्ही रमता तो विषय म्हणजे तुमचे करिअर – प्रा. दिगंबर ढोकले

लहु मुद्रा फाउंडेशनचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – ज्या विषयाचा अभ्यास करताना तुम्ही रमता तो विषय म्हणजे तुमचे करिअर समजा”, असा साधा सोपा सल्ला शिक्षणतज्ज्ञ प्रा. दिगंबर ढोकले यांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिला.     

निमित्त होते ऑटो क्लस्टरमध्ये रंगलेल्या लहु मुद्रा फाऊंडेशन आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिर व नागरी सत्कार समारंभाचे. यावेळी  नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, कला क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे, भाऊसाहेब अडागळे, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष अरुण जोगदंड, युवराज दाखले, नितीन घोलप, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, मुख्याध्यापक नटराज जगताप आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

इयत्ता दहावी व बारावीच्या पास नापास विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन करताना प्रा.दिगंबर ढोकले म्हणाले शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर तुमचा भविष्यकाळ उज्वल करायचा असेल तर शिक्षण आवश्यक आहे. आवडीच्या क्षेत्रात कोठेही गेला तरी तेथे सर्वोच्च स्थानी पोहचा. प्रामाणिकपणे कष्ट करणार्‍या प्रत्येकाला संधी मिळतेच फक्त ती संधी ओळखता यायला हवी आणि त्या संधीचे सोने करता आले तर तुमचा जीवनप्रवास हा इतरांसाठी आदर्श, प्रेरणा देणारा ठरेल.

त्याच प्रमाणे जिल्हा उद्योग केंद्राचे सेवानिवृत्त अधिकारी सुधीर जावळे यांनी विद्यार्थ्यांना उद्योग विकास कसा करावा ? उद्योगांसाठी प्रोत्साहन देताना शासकीय योजनांची माहिती दिली. त्यासाठी मिळणारे कर्ज, सबसिडी, आवश्यक कागदपत्रे यांची विस्तृत माहिती देऊन नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बना असा बहुमोल सल्ला दिला.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळावर राज्यमंत्री दर्जा असलेल्या अध्यक्षपदी अमित गोरखे  व संचालकपदी मनोज तोरडमल यांची नियुक्ती झाल्याबद्दल लहुमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवडचे विद्यमान महापौर राहूल जाधव, रा.स्व.संघाचे धर्म जागरण समितीचे प्रांत प्रमुख हेमंत हरहरे व लहु मुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलजी सौदंडे यांच्या हस्ते सन्मान करून मानाचा फेटा बांधून नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून लहु मुद्रा फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे अनावरण मान्यरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्य प्रवर्तक आसाराम कसबे यांनी लहुमुद्रेतील मुख्य विचारांचे वाचन करुन लहुवंदना सादर केली. तसेच लहु मुद्रा फाऊंडेशन स्थापनेचा हेतू  व भविष्यातील वाटचालीचा आराखडा प्रास्ताविकातून स्पष्ट केला.

नागरी सत्काराला उत्तर देताना अमित गोरखे म्हणाले,  हा सत्कार माझ्या कुटुंबातील आहे. मी समाजासाठी नैतिकदृष्ट्या बांधील आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्षपद भूषविताना समाजातील गुणवंत व्यक्तीला योग्य मदत मिळवून देणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन आवश्यक ते सर्व सहकार्य करणे ही माझी प्रथम जबाबदारी आहे आणि सर्वांच्या सहकार्याने ती सक्षमपणे मी पार पाडेन अशी ग्वाही दिली. तसेच महामंडळावर संचालक म्हणून काम करताना मोठी जबाबदारी आहे आणि ती मनापासून प्रामाणिकपणे पार पाडण्याची क्षमता सर्वांच्या सहकार्यातून मिळावी ही अपेक्षा मनोजजी तोरडमल यांनी व्यक्त केली.

महापौर राहुल जाधव यांनी रिक्षा चालक ते महापौरपद हा स्वतःचा प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत उलगडून सांगताना कष्ट व प्रामाणिकपणाचे फळ मिळतेच हा विश्वास सर्वांना दिला. तसेच अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीला लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य पिंपरी-चिंचवड महापालिका करेल असे आश्वासन दिले. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लहु मुद्रा फाऊंडेशनच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहु मुद्रा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अविनाश कांबीकर सचिव महेश खिलारे कोषाध्यक्ष राजेश आरसुळ, गणेश कांबळे, रवी कांबळे अजय साळुंके, डाॅ.शशिकांत कसबे,डाॅ.पवनकुमार देडे, योगेश लोंढे, बालाजी मोरे, संतोष तेलंगे, भिमा वाघमारे, शिवाजी साळवे, संजय ससाणे, किशोर हातागळे, गणेश साठे, राजेश बावणे, या सर्वांनी योगदान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी साठे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय स्मीता जोशी यांनी करुन दिला. तर आभार अनिल सौंदडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.