Talegaon : सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या चित्राचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त (दि.27) त्यांच्या चित्राचे सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना सरदार सत्यशीलराजे दाभाडे म्हणाले की, सरसेनापती दाभाडे घराणे म्हणजे इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. कर्तृत्वाच्या जोरावर गगनाला गवसणी घालण्याची किमया केलेल्या आमच्या पूर्वजांचा शौर्यशाली वारसा असणाऱ्या या घराण्यात माझा जन्म झाला, इथेच आयुष्य सफल झाले.

एकविसाव्या शतकाच्या या उंबरठ्यावर राजेशाही नाही, आता तुम्हा आम्हा सर्वांचे प्रजासत्ताक उदयाला आले आहे. तरीही गौरवशाली इतिहासाचा आम्हाला लाभलेला हा वारसा आणी परंपरा आम्ही नेटाने पुढे चालविण्यात सदैव तत्पर असू, आणि या कामी आई भवानी आम्हाला शक्ती देणार यात यत्किंचितही संदेह नाही.

त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रीमंत शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे, ख्यातनाम चित्रकार जहांगीर वजिफदार व माझ्या मार्गदर्शनाखाली चौगुले पिता-पुत्रांनी तयार केलेल्या चित्राचे लोकार्पण करीत असल्याचे जाहीर केले. सर सेनापती खंडेराव दाभाडे यांचे हे चित्र यापूर्वी कधीही प्रकाशित झाले नव्हते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.