NaviSangvi : समाजाचे कान टोचण्याचे काम विचारवंतांनी केले पाहिजे : आमदार जगताप

ज्ञानगंगा व्याख्यानमालेला नवी सांगवीत सुरुवात

एमपीसी न्यूज – समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचे काम विविध प्रकारच्या संस्था करीत असतात. पण, समाजाच्या वैचारिक समृद्धीची गरज साहित्यिक, विचारवंतच पूर्ण करू शकतात. समाजाचे कान टोचण्याचे काम विचारवंतांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित ज्ञानगंगा व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आप्पासाहेब खोत, डॉ. तुकाराम पाटील, अ‍ॅड. रामचंद्र शरमाळे, संयोजक सूर्यकंत गोफणे, श्रीकांत चौगुले, अ‍ॅड. शंकर थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, की ज्याप्रमाणे शेतीची मशागत शेतकरी करतो. त्याप्रमाणे मनाची आणि बुद्धीची मशागत साहित्यिक, विचारवंत करीत असतात. त्यामुळे या दोघांचेही कार्य महत्त्वाचे आहे. म्हणूनच औत आणि दौत एकत्र आले, तर समाजाचा विकास अधिक होईल, असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर आप्पासाहेब खोत म्हणाले, माता, माती आणि माणसाचे नाते अतूट आहे. माणसाची जडणघडणही त्यामुळेच होते. पण बदलत्या परिस्थितीत माणसामाणसातील संवाद हरवत चालला आहे. थेट संवादाऐवजी सोशल मीडियातला संवाद वाढत चालला आहे. त्यामुळे तरुणपिढी भरकटत चालली आहे. त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम चांगली पुस्तकेच करू शकतात. तरुणांनी वाचन केले पाहिजे. चांगली चरित्रे चारित्र्य घडवतात.

दरम्यान, आप्पासाहेब खोत यांनी आपली प्रसिद्ध विनोदी कथा ‘गॅदरिंगचा पाहुणा’ सादर केली. कोल्हापुरी ग्रामीण बोली, माणसातील विविध प्रवृत्ती आणि लकबी यातून होणार्‍या भाषिक विनोदातून त्यांनी रसिकांना खळखळून हसविले. त्यांच्या कथाकथनाला भरभरून दाद मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत गोफणे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय श्रीकांत चौगुले यांनी, सूत्रसंचालन गजानन पातूरकर यांनी केले. तर आभार अ‍ॅड. शंकर थिटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.