Pimpri: प्रलंबित प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, रेडझोन, पवना बंद जलवाहिनी, रिंगरोड, निगडीपर्यंत मेट्रो, वाढती गुन्हेगारी, महागाई, इंधन, गॅस दरवाढ, महापालिकेतील भ्रष्टाचार आदी प्रश्नांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उद्या (शनिवारी) निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प समूहासमोर दुपारी तीन वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

भाजपचे शनिवारी दुपारी तीन वाजता प्राधिकरणात ‘अटल संकल्प महासंमेलन’ होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट येणार आहेत.

विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी आज (शुक्रवारी) महापालिकेत पत्रकार परिषद घेतली. शहरातील प्रलंबित प्रश्नांची माहिती देत मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांवर बोलण्याची मागणी केली.

भारतीय जनता पक्षाची केंद्रात, राज्यात व महापालिकेत सत्ता असूनही शहरातील एकही प्रश्न अद्याप सुटला नाही. ‘मुख्यमंत्री फडणवीस यांना शहरवासियांना खोटी आश्वासने देण्याची सभेमध्ये मोठी सुवर्णसंधी आहे. मुख्यमंत्री फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठी शहरात येतात. आत्ताही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी येत असून ते जनतेला फक्त खोटीच आश्वासने देणार आहेत, असे विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले.

सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री फडणवीस काही महिन्यापुर्वी भोसरी येथे आले होते. त्यावेळी ते रिंगरोड बाधितांची भेट न घेताच गेल्याने मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे त्यांनी उद्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा करावी.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.