Oppose to Property tax hike : मिळकत करवाढीचा प्रस्ताव प्रामाणिक करदात्यांवर अन्यायकारक ; स्वयंसेवी संस्थांची भूमिका

एमपीसी न्यूज : पुणे महापालिका आयुक्तांनी उत्पन्न वाढीसाठी मिळकतकरात 11 टक्के वाढीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला आहे. परंतु खास सभेत यावर अंतिम निर्णय होणार आहे. तरी हा प्रस्ताव प्रामाणिक करदात्यांवर अन्यायकारक असल्याची संतप्त भूमिका स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली.

प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या पुणेकर नागरिकांना हा बोजा सहन करावा लागणार आहे. मात्र दुसरीकडे वर्षानुवर्षे मनपाच्या मिळकतकराची थकबाकी ठेवणाऱ्यांसाठी 75 टक्के सूट देणारी अभय योजना महापालिका राबवत आहे. गेल्या 3 महिन्यांत 50 लाखापर्यंत थकबाकी असणार्या थकबाकीदारांना जवळपास 175 कोटी रुपयांची सूट देऊन महापालिकेने 370 कोटी रुपये थकीत कर मिळवला आहे.

याव्यतिरिक्त 1 कोटीच्या वर महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी असणाऱ्या 474 थकबाकीदारांकडील 1218 कोटी रुपये थकबाकीवसुली साठी प्रयत्नच होताना दिसत नाहीत, ज्यामध्ये पाटबंधारे खात्याकडील 53 कोटी तर अन्य सरकारी, निमसरकारी खात्यांकडे 50 कोटींची थकबाकी आहे. याशिवाय पाणीपट्टीची जवळपास 400 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, हजारो कोटी रुपयांची थकबाकी वसुली करायची सोडून प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर कर वाढवून जेमतेम 130 कोटी रुपयांचा महसूल जमा करणे म्हणजे हा तुघलकी कारभार आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक टंचाईत असलेल्या प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना करवाढीची शिक्षा आणि थकबाकीदारांना अभय हा अन्याय असून मिळकतकर वाढ करू नये, ही नम्र विनंती आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.