Pune : विरोधी पक्षनेते जाहीर, पण शहराध्यक्ष कधी जाहीर होणार?

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेविका दीपाली धुमाळ यांची निवड शुक्रवारी जाहीर करण्यात आली. पण, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी निवड कधी जाहीर होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील आमदार झाल्याने त्यांचा भार कमी करून इतर उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे. भाजपने शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड जाहीर करून ‘युवा पर्वाची’ सुरुवात केली आहे.

आगामी काळात वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार असल्याने भाजपमधून मोठ्या प्रमाणात काँग्रेस – राष्ट्रवादीत ‘घरवापसीची’ चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, विशाल तांबे, सचिन दोडके यांच्या नावाची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.