Pimpri: विरोधी पक्षनेते आणि महापालिका आयुक्तांमध्ये खडाजंगी!

एमपीसी न्यूज –  अगोदरच विरोधकांच्या रडारवर असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने या दोघांमध्ये आज (शुक्रवारी)चांगलीच खडाजंगी झाली. स्मार्ट सिटीच्या बैठकीतच खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांने आयुक्तांना खडे बोल सुनावले. तर, आयुक्तांनाही आपली भुमिका योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने शहर सल्लागार समितीची स्थापना केली आहे. औद्योगिक, नागरी संघटना, पत्रकार संघ अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना या समितीत घेतले आहे. या समितीची पहिली बैठक आज (शुक्रवारी) आयुक्तांच्या दालनात पार पडली. या बैठकीला महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण  जगताप, महेश लांडगे,  गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह स्मार्ट सिटीचे सल्लागार उपस्थित होते.

स्मार्ट सिटीअंतर्गत कासारवाडी आणि सेक्टर 23 येथे प्रायोगिक तत्वावर सोलर सिस्टीमचा प्रकल्प राबविला जाणार आहे. केंद्र सरकारची कंपनी याचा संपूर्ण खर्च करणार आहे. या कंपनीने निर्मित केलेली वीज महापालिका प्रति युनीट साडेतीन रुपये या दराने विकत घेणार आहे. तर, महापालिका कचरा व राडारोड्यापासून तयार होणारी वीज साडेसहा प्रति युनीट दराने विकत आहे. याला विरोधी पक्षनेते दत्ता साने आक्षेप घेतला.

_MPC_DIR_MPU_II

त्यावर बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, हे दोन्ही विषय वेगळे असून गफलत करु नका. अज्ञानातून असे काही बोलू नका. आयुक्तांचे उत्तर ऐकून विरोधी पक्षनेते दत्ता साने संतापले. आक्रमक होत त्यांनी आयुक्तांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. मी सज्ञान असून मी विचारलेल्या प्रश्नांचे तुम्ही उत्तरे द्या. 15 वर्षांपासून मी जनतेतून निवडून  येत आहे.  आम्ही काय ‘हजामती’ करायल इथे येत नाही. तुम्ही नोकर असून आम्ही विश्वस्त आहोत, असेही साने यांनी आयुक्तांना सुनावले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती देणे अपेक्षित आहे. अडचणीचे प्रश्न विचारल्यावर आयुक्त ‘व्हायबल’ होतात. आवाज चढवितात. त्यांच्याकडे कोणताही संयमीपणा नाही. नगरसेवकांशी बोलताना त्यांनी चढ्या आवाजाने बोलणे अपेक्षित नाही. नगरसेवक विश्वस्त असतात. तर, आयुक्त नोकरदार असतात, याची जाण ठेवली पाहिजे. आयुक्त विरोधी पक्षनेत्याशी असे बोलत असतील तर बाकीच्या नगरसेवकांशी कसे बोलत असतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच हर्डीकर हे आयुक्त नसून भाजप प्रवक्ते आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी देखील आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर हल्लाबोल केला. पत्रकारांशी बोलताना कलाटे म्हणाले, गेल्या दीड वर्षात पालिकेची मोठी बदनामी झाली आहे. त्याला उत्तर देण्यास सत्ताधारी कमी पडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांकडे भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविली असल्याचे, त्यांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीवरुन दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.