Pune News : पाणी मीटर बसवण्यास विरोध, फक्त 62 हजार मीटर बसवण्यास यश

एमपीसी न्यूज – शहरातील समान पाणी पुरवठा योजना करण्यामागे सर्वांना समान पाणी मिळणे आणि पाण्याचे वॉटर ऑडिट होणे हे महत्त्वाचे काही उद्देश होते, मात्र पाणी मीटर बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्यामुळे महापालिका प्रशासन वॉटर ऑडिट कसे करणार हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे निवासी आणि व्यावसायिक अशा पध्दतीने 50 टक्के मीटर लागणे आवश्यक होते. प्रत्यक्षात केवळ 62 हजार मीटरच चार विभागात बसवण्यात आले आहेत. शहरात एकूण 3 लाख 18 हजार मीटर बसवणे आवश्यक आहे.

समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मीटरने पाणी देण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. योजनेसाठी पाणी पट्टी सुध्दा वाढवण्यात आली. समान पाणी पुरवठा योजनेचे काम 55 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे निवासी आणि व्यावसायिक अशा पध्दतीने 50 टक्के मीटर लागणे आवश्यक होते. प्रत्यक्षात केवळ 62 हजार मीटरच चार विभागात बसवण्यात आले आहेत. शहरात एकूण 3 लाख 18 हजार मीटर बसवणे आवश्यक आहे.

याविषयी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख, अनिरुध्द पावसकर म्हणाले., शहरात ज्या पध्दतीने मीटर बसवणे आवश्यक आहे त्यापध्दतीने काम होत नाही. मीटर बसवण्यासाठी विरोध होतो. मीटर बसवले म्हणजे, मीटरने लगेच पाणीपट्टी सुरु करणार असे सुध्दा नाही. जलसंपदा विभाग वारंवार महापालिका पाणी जास्त वापरत असल्याचा आरोप करत असते, त्याचबरोबर आपण 35 टक्के पाणीगळती असल्याचे सांगतो. महापालिका प्रत्येक ठिकाणी मीटरींग करणार आहे. त्यामुळे टाकीतून पाणी सोडताना त्याचे मोजमाप करता येईल. निवासी आणि खासगी मिळकतींना मीटर बसवण्यात आल्यास पाण्याचे ऑडिट करणे सोपे होणार आहे. पाण्याची बचत करण्यासाठी आणि नियोजनासाठी हे आवश्यक आहे. योजना करताना पाणीचे मोजमाप झाले पाहिजे या गोष्टीचा विचार करण्यात आला होता. लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला पाणी मिळणार असेल तर त्याचे वाटप सुध्दा मोजूनच होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

पाण्याचे मीटर बसविण्यास विशेषत: निवासी मिळकतदारांकडून विरोध केला जात आहे. बसविण्यात आलेले पाणी मीटर काढून टाकण्याचे प्रकारही घडत आहे. लोकप्रतिनिधींकडूनही पाण्याच्या मीटरला विरोध होत असतो. यामुळे पाण्याचे मीटर बसविण्याचे प्रमाण कमी आहे. आजपर्यंत केवळ सव्वा तीन लाख मिळकतींपैकी 62 हजार मिळकतींनाच पाण्याचे मीटर बसविले गेले आहे. निवासी मिळकतदारांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन महापालिकेने आता व्यावसायिक वापराच्या मिळकतींना पाण्याचे मीटर बसविण्यास प्राधान्य दिले आहे. यामध्ये सर्वप्रकारची हॉटेल, वसतिगृहे, लॉज आदींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.