Pimpri : दत्ताकाका घड्याळ काढून शिवबंधन बांधणार ? उद्या मुलाखतीला राहणार गैरहजर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने घड्याळ काढून धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. साने यांनी फेसबुकवर चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणे वावगे नाही. पण त्याचे फोटो सोशलमीडियावर व्हायरल केल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले आहे. 

चिखली भागातून दत्ता साने सलग तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. महापालिकेत एकहाती सत्ता असताना पक्षाने त्यांना कोणतेही महत्वाचे आणि मोठे पद दिले नाही. महापालिकेत विरोधी पक्षात गेल्यानंतर दुस-या वर्षी साने यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. साने यांनी सत्ताधा-यांना जेरीस आणले होते. प्रशासनाविरोधात आवाज उठविला होता.  चुकीच्या कामाला प्रखर विरोध केला होता.

साने यांची भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज देखील केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा आणखीन दोन महिने कार्यकाळ वाढवून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पक्षनेतृत्वाशी देखील त्याबाबत बोलले होते. परंतु, मुदतवाढ दिली नाही. तसेच विधानसभेच्या उमेदवारीचे देखील ठोस आश्वासन मिळत नाही. त्यामुळे साने चिंतेत आहेत.

त्यातच साने यांनी आज  यांनी फेसबुकवर चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणे वावगे नाही. पण त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीतील विधानसभा इच्छुकांच्या उद्या (रविवारी) पुण्यात मुलाखती होणार आहेत. मुलाखतीला साने गैरहजर राहणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, याबाबत दत्ता साने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.