Chikhali : फोनवर ऑर्डर देऊन थंड पाण्याचे 150 जार लंपास

एमपीसी न्यूज – थंड पाण्याचे 150 जार घेऊन जाऊन ते परत न करता तसेच त्याचे पैसे न देता फसवणूक केली. चिखली येथे 8 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 18) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिगंबर शिवाजी क्षीरसागर (वय 31, रा. जाधववाडी-मोशी लिंक रोड, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्षीरसागर यांचा चिखली येथील शेलारवस्ती येथे थंड पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. एका मोबाइल क्रमांकावरून त्यांना फोन आला. योगेश मालखेडे असे नाव अज्ञात व्यक्तीने सांगितले. देहूगाव येथे कार्यक्रम असून, त्यासाठी थंड पाण्याचे 150 जार पाहिजे आहेत, असे सांगून आरोपी याने फिर्यादी क्षीरसागर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एक वाहन पाठवून फिर्यादी यांच्याकडून थंड पाण्याचे 150 जार घेऊन गेला. मात्र, त्याचे पैसे न देता तसेच जार परत न करता फिर्यादी क्षीरसागर यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.