Pimpri : अवयवदान ही चळवळ व्हायला हवी – डॉ. कपिल झिरपे

रोटरीची तीन दिवसीय आरोग्य व्याख्यानमाला उत्साहात

एमपीसी न्यूज – विदेशात अवयवदानाच्या बाबतीत खूप मोठी प्रगती झाली आहे. विदेशातील बहुतांश लोक अवयवदान करतात. त्याचा त्यांच्या देशातील गरजू रुग्णांना फायदा होतो. त्या तुलनेत भारतात अवयवदानाविषयी जनजागृती अतिशय कमी आहे. अवयवदान हा उपक्रम न होता याची चळवळ व्हायला हवी. तर यातून काहीतरी चांगले साकार होणार आहे, असे मत डॉ. कपिल झिरपे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ चिंचवड, समाजसेवा केंद्र, पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन,पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनआणि इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. व्याख्यानमालेच्या अंतिम पुष्पात रुबी हॉल क्लिनिकचे अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. कपिल झिरपे यांनी ‘अवयवदान एक श्रेष्ठ दान (समज व गैरसमज)’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, सचिव बाळकृष्ण खंडागळे, पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत जीवतोडे, कार्याध्यक्ष डॉ. संजीव दात्ये, रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा मनीषा समर्थ, समाजसेवा केंद्राचे पी एस मुखर्जी, डॉ. शोभना पालेकर, मीना गुप्ता, डॉ. शीतल पोखरकर आदी उपस्थित होते.

डॉ. कपिल झिरपे म्हणाले, “एखाद्या रुग्णाचा मेंदू मृत झाला, तर त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय त्याच्या नातेवाईकांनी घ्यायला हवा. तसेच प्रत्येकाने अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या मृत्यूनंतर कित्येक अवयव आपण दान करू शकतो. मृत्यूनंतर ठराविक कालावधीपर्यंत आपले काही अवयव जिवंत असतात. हे अवयव जर गरजू लोकांना मिळाले तर त्या माध्यमातून आपल्याला जिवंत राहता येईल. सध्या त्वचादान करण्याची मागणी वाढत आहे. पण एकंदरीत विचार केला तर याबाबत जनजागृती व्हायला हवी”

अवयवदानाच्या बाबतीत अनेक गैरसमज सध्या समाजात आहेत. एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून ते विकले जातात, वैगेरे भ्रामक कल्पना लोकांच्या मनात अजून घर करून आहेत. याबाबत शासकीय यंत्रणा अतिशय पारदर्शक आहे. गरजू रुग्णांची शासकीय यादी पूर्वनियोजित असते. त्याच यादीनुसार लोकांना अवयव देण्यात येतात. याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. सध्या अवयव बदलण्याची प्रक्रिया केवळ खाजगी रुग्णालयात सुरू आहे. ही व्यवस्था जर सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू झाली तर अवयव बदलण्याचा खर्च शेकडो पटींनी कमी होईल. शासनाने याबाबत लवकरात लवकर पावले उचलायला हवीत, असेही डॉ. कपिल झिरपे म्हणाले.

सूत्रसंचालन डॉ. नीलम ढमाले यांनी केले. डॉ. आशिष पोखरकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.