Pune : चौथ्या ‘पुणे पॉटर्स मार्केट’चे आयोजन; देशभरातून सहभागी होणाऱ्या ४० मातकाम कलाकारांची कला पाहण्याची पुणेकरांना संधी

एमपीसी न्यूज : मातीपासून बनलेली (Pune) भांडी, मातीच्या वस्तू यांचा मानवाशी असलेला संबंध तसा जुना आहेच. मात्र आजच्या नवयुगात मातकला हा छंद जोपासत आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवीत, त्याला आधुनिक पद्धतीने सादर करीत या कलेचे पुनरुज्जीवन करणारे कलाकार आणि त्यांची कला पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होत आहे. निमीत्त आहे पुण्यातील इंद्रनील गरई यांच्या आयजीए गॅलेरियाच्या वतीने आणि भूमी पॉटरी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘पुणे पॉटर्स मार्केट’ या खास प्रदर्शनाचे.

सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉल या ठिकाणी हे प्रदर्शन 20, 21, 22 सप्टेंबर आणि 27, 28, 29 सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आले आहे. ‘पुणे पॉटर्स मार्केट’चे हे चौथे वर्ष असून दोन्ही टप्प्यांत सकाळी 11 ते रात्री 9 दरम्यान सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनासोबतच मातकामासंबंधी विशेष कार्यशाळांचे आयोजन देखील यादरम्यान करण्यात आले असल्याची माहिती या संकल्पनेचे जनक इंद्रनील गरई यांनी दिली.

याबद्दल अधिक माहिती देताना गरई म्हणाले की, “मातकाम ही सर्वांत जुनी आणि गेली कित्येक शतके मानवाला अवगत असलेली कला असून पुणे पॉटर्स मार्केटच्या निमित्ताने देशभरातील मातकाम करणाऱ्या (Pune) कलाकारांना एकाच छताखाली आणीत त्यांची कला पुणेकरांसमोर सादर करणे हे या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मागील तीन वर्षे याला पुणेकरांचा मिळालेला प्रतिसाद पहाता आम्ही याही वर्षी हे प्रदर्शन घेऊन आलो आहोत.”

या पॉटरी फेस्टिव्हलमध्ये प्रामुख्याने स्टुडीओ पॉटर्स आणि आपल्या कलेला हाताने मूर्त रूप देणाऱ्या तब्बल 40 कलाकारांचा सहभाग आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या, वापरात येणाऱ्या मातीच्या वस्तू, सिरॅमिकमध्ये बनविलेली शिल्पे, भित्तिचित्रे, दागिने आणि विशेष कलाकृती पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे.

पुणे, मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, आग्रा, भोपाळ, कलकत्ता, रायगड आणि अजमेर अशा महत्त्वाच्या शहरांमधून मातकाम कलाकार आपल्या शहराची खासियत असलेल्या मातेच्या वस्तू यामध्ये प्रदर्शित करतील. मातीच्या वस्तूंसोबतच दगड आणि टेराकोटा पासून बनविलेली भांडी, वस्तू यांचाही समावेश प्रदर्शनामध्ये असेल असेही गरई यांनी नमूद केले.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share