Junnar : बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज : सह्याद्रीच्या कुशीत (Junnar) इतिहास, भुगोल, निसर्ग, पर्यावरण, लोकजीवन, साहस, पर्यटन इ. सर्व क्षेत्रांची इत्यंभूत विविधता जपलेला तालुका म्हणजे शिवजन्मभुमी जुन्नर. याच अलौकीक वैशिष्ट्यांमुळे जुन्नर महाराष्ट्रातील व देशातील पहिला पर्यटन तालुका ठरला. जुन्नर तालुक्यातील हे सर्व वैभव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी येथील शिवनेरी ट्रेकर्स संस्थेमार्फत राज्यातील प्रमुख ठिकाणी बहुआयामी जुन्नर या छायाचित्र प्रदर्शन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शन मालिकेतील पहिले छायाचित्र प्रदर्शन छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून येत्या 16 व 17 जानेवारी रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर कलादालन येथे होणार आहे. पाठोपाठ मुंबई, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रदर्शनात काय??
जुन्नर तालुक्यातील दुर्गवैभव, लेणीसमुह, घाटवाटा, धरणे, धबधबे, आदिवासी लोकजीवन, खाद्यसंस्कृती, मंदिरे, निसर्ग व वनसंपदा, शेती, जैवविविधता या सर्वांचे दर्शन या प्रदर्शनात होणार आहे. जुन्नर तालुक्यातील छायाचित्रकारांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचा यात समावेश आहे. यासह वन विभाग, वारसा संवर्धन समिती बोरी बुद्रुक व चाईल्ड फंड इंडिया या संस्थांची स्वतंत्र दालने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. सोबतच जुन्नरचा प्रागैतिहासिक ठेवा व इतर संलग्न विषयांवर व्याख्यानांचेही आयोजन होणार आहे.

निशुल्क प्रवेश – Junnar
जुन्नरच्या इतिहास, निसर्ग, पर्यावरणाचा ठिवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे प्रदर्शन निशुल्क करण्यात आले आहे. सर्व वयोगटाच्या व्यक्तींना 16 व 17 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 हे प्रदर्शन मोफत पाहता येईल. अधिकाधिकी विद्यार्थ्यांपर्यंत प्रदर्शन पोहचविण्यासाठी पुणे शहरातील शाळा व महाविद्यालयांनाही यात निमंत्रित करण्यात येणार आहे.

पुणेकरांची जुन्नरशी थेट जोडणी
निसर्ग व पर्यटन प्रेमी पुणेकरांची जुन्नरच्या इतिहास व पर्यटनाशी थेट जोडणी व्हावी यासाठी या प्रदर्शनातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रदर्शन पाहिल्यानंतर आवडलेल्या विषयातील स्थळांना भेट देण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना जुन्नरमधील त्या त्या क्षेत्रातील अग्रणी अभ्यासक व सेवादात्यांशी निशुल्क जोडणी करुन देण्यात येणार आहे. यामुळे प्रदर्शन फक्त नेत्रसुखद न ठरता जुन्नरच्या या ठेव्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठीचे पुढचे पाऊल ठरणार आहे.

शिवनेरी ट्रेकर्स विषयी
शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन ही जुन्नर तालुक्यातील निसर्ग व दुर्गप्रेमी ट्रेकर, गिर्यारोहक तरुणांनी स्थापन केलेली शासन नोंदणीकृत विश्वस्त संस्था आहे. इतिहास, क्रिडा, निसर्ग, पर्यावरण व दुर्गसंवर्धनाच्या अनुषंगाने संस्थेमार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शिवकालिन युद्धकला प्रशिक्षण, दुर्गस्वच्छता, ट्रेकिंग आदी उपक्रमांचा यात समावेश आहे. संस्थेमार्फत या वर्षी जुन्नरची विविधता अधिक परिणामकारकपणे राज्यभर पोहचविण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन
फक्त जुन्नर तालुक्यातीलच नाही तर राज्यभरातील छायाचित्रकार जुन्नरमधील उत्कृष्ट छायाचित्रांसह या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवू शकतात. यासाठी डीएसएलआर कॅमेरा ने काढलेली किमान 5 एमबी आकाराची छायाचित्रे पाठविणे आवश्यक आहे. निवडक, उत्कृष्ट छायाचित्रांना प्रदर्शनात स्थान देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रदर्शन उपक्रम प्रमुख अनिकेत डुकरे (7498693174) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.