Vadgaon Maval : कोरोना रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एरोबिकचे आयोजन

एमपीसी न्यूज :  मावळ तालुक्यातील कृषी पणन कोव्हीड सेंटर व तोलानी कोव्हीड सेंटर येथे रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने व शारीरिक व्यायामासाठी एरोबिकचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या पुढाकाराने पार्थदादा पवार फाउंडेशनच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते.

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण देखील पुण्यातूनच समोर आला होता. आणि आता दुसऱ्या लाटेत देखील पुणे जिल्ह्याला ग्रामीण भागासह कोरोनाने विळखा घातला.

पार्थदादा पवार फाउंडेशनच्या वतीने व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भेगडे यांच्या प्रयत्नाने कोरोना रुग्णांसाठी एरोबिकचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनानंतर सहभागी झालेल्या रुग्णांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे डॉक्टरांनी आयोजकांना कळवले आहे.

मावळ तालुक्यातील पहिले नृत्य प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे राहुल देठे यांनी ‘स्टेप हार्ड डान्स अॅकेडमी’ मार्फत पुढाकार घेतला होता. कोरोना सुरू झाल्या पासून डान्स अॅकेडमी पूर्वपदावर नसल्याने आर्थिक परिस्थितीचा सामनाही नृत्य प्रशिक्षक राहुल देठे यांना करावा लागला आहे.

मात्र अशाही परिस्थितीत स्वतः सकारात्मक राहून इतरांनाही ते मानसिक व शारीरिक सदृढ ठेवण्याचे समाजकार्य करीत आहेत. या एरोबिक मध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी त्यांनी विना मोबदला समाजकार्य करण्याचे काम सुरू ठेवले आहे. यामुळे त्यांचे कोरोना योद्धा म्हणून विशेष कौतुक होत आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भेगडे हे देखील कोरोना सुरू झाल्यापासून सामाजिक क्षेत्रात अधिक मेहनत घेत आहेत. तळा गाळापर्यंत  उतरून त्यांनी मागील दोन वर्षांत अनेक गरजूंना मदत केली आहे. समाजकार्याचा वसा असाच पुढे सुरू ठेवणार असल्याचे नगरसेवक संतोष भेगडे यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.