Talegaon Dabhade News : महावितरण आणि जनसेवा विकास समितीच्या वतीने जनता दरबार चे आयोजन

एमपीसी न्यूज –  विद्युत महावितरण तळेगाव दाभाडे व जनसेवा विकास समितीच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील जोशीवाडी येथे जनता दरबार आयोजित केला होता.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व विद्युत महावितरण तळेगाव दाभाडे युनिटचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे यांच्या  संकल्पनेतून ग्राहकांच्या वीज बिलांसंबंधी असणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे, थकीत वीज बिलांना सुलभ हफ्ते करून देणे, चुकीच्या वीज बिलाची दुरुस्ती करून देण्यासाठी सदर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

मागील आठवड्यात विद्युत महावितरणचे अधिकारी थकीत वीज बिलांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आले असता जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कडाडून विरोध केला व वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

जोशीवाडी व परिसरातील कुटुंब मध्यम वर्गीय व कष्टकरी कामगार वर्गातील असल्याने वीज पुरवठा खंडित करण्याआधी सदर नागरिकांच्या समस्या विद्यूत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समजून घ्याव्यात असे आवाहन किशोर आवारे यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे यांना केले होते.

 दरम्यान राजेंद्र गोरे यांनी जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत जनता दरबाराचे आयोजन केले.

या वेळी जोशीवाडी व परिसरातील बहुसंख्य नागरिक विद्युत बिलांसकट आपल्या तक्रारी मांडण्यासाठी उपस्थित होते. बहुसंख्य थकीत वीजबिल ग्राहकांना किशोर आवारे यांनी सुलभ हफ्ते करून दिले आहेत.

जागेवर वीज बिल भरणा देखील करण्यात आला तसेच चुकीच्या वीज बिलांची दुरुस्तीही करण्यात आली. थकीत वीज बिलांमुळे एकही विद्युत पुरवठा खंडित करून देणार नाही असे किशोर आवारे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

जनसेवा विकास समितीचा विद्युत  जनता दरबार हा वाड्या वस्त्यांमध्ये राबवावा, आम्ही सुलभ हफ्ते करून देउ असे राजेंद्र गोरे यांनी आश्वासन दिले.

याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक सुनील कारंडे, नगरसेवक रोहित लांघे, प्रवक्ता मिलिंद अच्युत, आर पी आय चे सुनील पवार , महावितरणचे राठोड साहेब, प्रशांत गवारे, रोखपाल सय्यद साहेब व बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.