Pune News : अठरा वर्षे पूर्ण केलेल्या अनाथांना महापालिकेकडून मिळणार अर्थसहाय्य !

एमपीसी न्यूज : वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या अनाथांना संस्थेचा आश्रय मिळू शकत नाही. मात्र त्यानंतरही आयुष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारासाठी भांडवलाची गरज त्यांना भासते. त्यासाठी पुणे महापालिकेने तंत्रशिक्षण, विविध प्रकारचे प्रशिक्षण व  स्वयंरोजगारासाठी त्यांना पाच ते दहा हजारांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण समितीच्या नुकत्याच झालेल्या पाक्षिक सभेत याविषयी निर्णय घेण्यात आला. 

या संदर्भात महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, महापालिकेत पहिल्यांदाच अनाथ मुलांची दखल घेत त्याविषयीच्या ठरावाला मान्यता देण्यात आली आहे. याद्वारे अनाथ व्यक्तींना,अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, शैक्षणिक सद्यस्थिती व सध्याच्या वास्तव्याचा पुरावा अशा कागदपत्रांच्या आधारे महिला व बालविकासाच्या योजनांचा लाभ घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

2016 सालच्या राज्य सरकारच्या शासन निर्णया प्रमाणे अनाथांना नोकरी व शिक्षणामध्ये 1 टक्के समांतर आरक्षण देण्यात आले आहे. पण संस्थेतून 18 वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर पडल्यावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या योजनेद्वारे पालिकेच्या योजनांचे ते लाभार्थी होऊ शकतील.

तंत्रशिक्षण आणि विविध प्रकारचे प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी पाच ते दहा हजारांचे अर्थसहाय्य, या योजनांचा फायदा त्यांना मिळेल. अशाप्रकारे अनाथांच्या कल्याणाची ही पहिलीच योजनेला महापालिकेने मंजुरी दिली आहे. अनाथांना प्रमाणपत्र देण्याचे अधिकार उपायुक्त, आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांना असून योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला असण्याची अटही येथे शिथिल केल्याची माहिती सहस्त्रबुुद्धे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.