Osmanabad Crime news : बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश

एमपीसीन्यूज ; अधिकार नसताना वारसाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या तडवळ्याच्या उपसरपंचासह लिपिक आणि प्रमाणपत्र धारकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उस्मानाबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याबाबत माहिती अशी की, तडवळ्याचे उपसरपंच सुरेश पाटील यांनी अधिकार नसताना मयत मुरलीधर कदम यांच्या नावाचे दोन वेगवेगळे वारसा प्रमाणपत्र दिगंबर कदम यांना दिले होते. याला आक्षेप घेत तडवळा येथील ग्रामस्थ सुभाष कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती.

तसेच तक्रारीची दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा. पं) यांनी उपसरपंच सुरेश पाटील, लिपिक रवींद्र घोरपडे, आणि प्रमाणपत्र हस्तगत करणारे दिगंबर कदम यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश गट विकास अधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद यांना दिले आहेत.

यात एस.पी शुगरचे चेअरमन तथा तडवळा गावचे उपसरपंच सुरेश पाटील यांच्यावर अधिकार नसताना दोन बोगस वारसा प्रमाणपत्र दिले बाबत जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.

यावर 10 दिवसात कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.