Osmanabad News: कृषी अधिकारी चिमनशेट्टे यांच्या चौकशीची मनसेची मागणी

चौकशी न झाल्यास खळ्ळखट्याक आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद जिल्हा परिषद कृषी विभागात नियमाचे पायमल्ली  करत संगनमत करून शेतकऱ्यांचे बायोगॅस यंत्रणा उभारणी, पाणबुडी संच अनुदान तसेच कृषी अनुदान वाटपात लाखो रुपयाचा कथित भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. जी. चिमनशेट्टे व संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी, अन्यथा खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

या निवेदनात म्हटले आहे, शासनाचे नियम डावलून नियमबाह्य पद्धतीने कारभार सुरू आहे जिल्हा परिषदेसह शासन निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या नोंदणी कसल्याही प्रकारचे पडताळणी केली नसल्याची गंभीर बाब लेखा परिक्षण अहवालातून समोर आले आहे. याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनाही अंधारात ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे साहित्य खरेदी मोठा भ्रष्टाचार झाला आहे तसेच अनुदानापासून दिव्यांगासह महिलांनाही या अनुदानाचा लाभ दिला गेला नाही. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कृषी विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषद कृषी विभागात खळखट्याक आंदोलन करण्यात येईल, आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, कळंब तालुका अध्यक्ष सागर बारकुल, तावरजखेडा सरपंच मुरली देशमुख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शेटे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.