Osmanabad News : ‘कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन द्या’

परिचारिका (नर्सेस) कर्मचारी सेवाभावी संस्थेची उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

एमपीसीन्यूज : कोरोना काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या नर्स, वार्ड बाॅय, लॅब टेक्नीशियन व कंत्राटी कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली. या कंत्राटी कर्मचार्‍यांचे तीन महिन्याचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे, आदी मागण्या परिचारिका (नर्सेस) कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत.

याबाबत संस्थेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. कोरोना काळात कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना कोरोना लसीकरण मोहिमेत सामावून घेण्यात यावे. या कर्मचार्‍यांना मासिक बेकार भत्ता देण्यात यावा. तसेच त्यांना शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये सामावून घेण्यात यावे.

या कर्मचार्‍यांचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे. भविष्यकाळामध्ये आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार्‍या कर्मचारी भरतीमध्ये ६०% जागा कोरोना काळात कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांसाठी राखीव जागा ठेवण्यात याव्यात आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

संस्थेच्या अध्यक्षा सुशिला गायकवाड, विजय बनसोडे, डाॅ.रमेश बनसोडे यांच्यासह कंत्राटी कर्मचारी स्नेहल घुले, आश्विनी लोहार, स्नेहल हत्तीकर, प्रतिक्षा जगदाळे, अंजली चव्हाण, कांबळे प्रगती, शिंदे रूपाली, अंबिका कारभारी, अपेक्षा भालेराव, शुभांगी नागरसोगे, रतन भडे, मीरा बलवंत, कविता तांबारे, प्रिया हावळे, जोती सांगळे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.