Osmanabad News: शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थी बेमुदत संपावर

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आजपासून (शुक्रवार) बेमुदत संप पुकारला असून विविध मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील कोविड आजाराच्या उपचारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . दि.9 शुक्रवारी सकाळी या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत घोषणाबाजी सुरु केली. यानंतर आंदोलनास सुरुवात झाली.

त्यांनी यावेळी अनेक मागण्या केल्या आहेत. यामध्ये मागील सहा महिन्यांपासून आम्ही विद्यार्थी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून कोविड रुग्णांवर उपचार करीत आहोत. तरीही आमच्यावर शासनाकडून अन्याय होत आहे. 12 ऑगस्ट रोजी शासनाने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस रुपयांनी वाढ केली. मात्र, यातून आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले. ही निषेधार्ह बाब आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शिक्षण कालावधी 31 ऑक्टोबर रोजी संपत आहे.  तरीही जिल्हा प्रशासनाने त्यांची 31 डिसेंबरपर्यंत कोविड ड्युटी लावली आहे. यातच आता प्रथम व अंतिम वर्षाच्या परीक्षाही तोंडावर आल्या आहेत. या अनुषंगाने शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोविड ड्युटीतून सूट मिळावी, अशीही मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.