Osmanabad News: हेक्टरी 25 हजार रुपये देऊन ठाकरी बाणा दाखवावा; आमदार राणा पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

एमपीसी न्यूज- गेल्या दोन दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात हातातोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.आपल्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्याने आता कोणतेही सोपस्कार पार न पाडता गेल्यावर्षी औरंगाबाद येथे आपण मागणी केल्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी तातडीने हेक्टरी ₹ २५ हजार देऊन आपला ठाकरी बाणा दाखवा, असे आवाहन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेली दोन दिवसांपासून अभूतपूर्व वादळी पाऊस पडत आहे. गुरुवारी या अनुषंगाने आमदार पाटील यांनी अनेक गावांत जाऊन पाहणी केली. अभूतपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून काढणीला आलेले व काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले असून ऊस व तूर आदी नगदी पिकं आडवी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे व रस्ते,पूल,बंधारे वाहून गेले आहेत तर वीज वितरण व्यवस्थेचे देखील नुकसान झाले असल्याचे आ.पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे .

15 दिवसांपूर्वी पिकांची परिस्थिती अतिशय चांगली होती त्यामुळे शेतकरी या हंगामात चांगलं उत्पन्न मिळेल या आशेवर बसले होते.मात्र पावसाने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे.

सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने अजून भर पडली आहे.नुकसानीची व्याप्ती पाहता आता यावर चर्चा न करता सरसकट मदत देणे योग्य राहील असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

सणासुदीचे दिवस जवळ आले असताना हाता तोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.आता त्याला झालेल्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.

राज्यातील कांही मंत्री सरकारकडे पैसा नाही अशी विधान करत आहेत, मात्र सरकारला महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या (जीएसडीपीच्या) 5% रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध होऊ शकते जी की अधिकचे जवळपास 1 लाख 60 हजार कोटी इतकी आहे त्यामुळे पैसा नसेल तर प्रचलित पद्धतीने कर्ज काढून मदत करावी असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसानं राज्यात अनेक ठिकाणी असेच नुकसान केले होते.तेंव्हा औरंगाबाद येथे नुकसानीची पाहणी केल्यावर आपण सरकारला कोणत्याही अटी न ठेवता तातडीने हेक्टरी ₹ 25,000 मदत देण्याची मागणी केली होती. आता मुख्यमंत्री या नात्याने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती आहेत त्यामुळे आपण त्वरेने शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्यावर्षी केलेल्या न्याय मागणीची पूर्तता करून “जे बोलतो ते करून दाखवतो” हा आपला बाणा सत्यात उतरवा असे आवाहन आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.